scorecardresearch

शहरबात: महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चिती अस्पष्टच

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. मात्र महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमांकन करण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज पावेतो  राज्यांचा सीमावाद उफाळून आला आहे.  

नितीन बोंबाडे

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. मात्र महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमांकन करण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज पावेतो  राज्यांचा सीमावाद उफाळून आला आहे.   प्रशासकीय असमंजस भूमिकेमुळे नागरिकांना वादाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सीमालगतच्या वेवजी, तलासरी, गिरगाव, गिमाणिया, झाई, आच्छाड, संभा तर गुजरात राज्यातील सोलसुंबा, उंबरगाव येथील नागरिकांमध्ये   सुसंवाद व व्यवहारात अडथळा निर्माण होत  आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य सेवांसाठी मुभा मिळावी यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे  आहे.

उंबरगाव शहराच्या जवळ तसेच वेवजी ग्रामपंचायतीच्या लगतच्या भागामध्ये दोन राज्यांमधील सीमेबाबत अस्पष्टता आहे. तसेच बोर्डी येथून तलासरीकडे जाताना १०० ते १५० मीटर गुजरात राज्यातून प्रवास करावा लागतो. उंबरगाव रेल्वे स्थानक गाठताना महाराष्ट्रातील नागरिकांना गुजरातमध्ये जावे लागते. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवरून नेहमी वादाचे प्रसंग उभे राहत असतात. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं २०४ चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर १७३ या दोन भूखंडांवर दोन्ही राज्यांची सीमा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. तर गूगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणिया, झाई, आच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आली आहेत.करोना संक्रमणाच्या काळात गुजरात प्रशासनाने गुजरात सीमा ओलांडून ५०० मीटर आत महाराष्ट्राच्या हद्दीत रस्ता खोदून बंद केला. दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनाही गुजरात प्रवेश बंदी घालून महाराष्ट्र सीमेवरील नागरिक, रुग्ण, सरकारी अधिकारी यांना मज्जाव करण्यात आला होता. गरोदर माता, आजारी रुग्णांना गुजरात, उंबरगाव येथे आरोग्य सेवा नाकारण्यात आली होती. महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने बेकायदा पथदिवे लावून घूसखोरी केल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्रातील नागरिकांनी विरोध सुरू केल्याने  सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. मात्र महाराष्ट्रातील वेवजी आणि गुजरात राज्यातील सोलसुंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सीमा निश्चिती अस्पष्ट असल्याने संघर्ष पेटला आहे.

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालतात. महाराष्ट्रातील झाई, बोर्डीनजीकची गावे गुजरात राज्याच्या उंबरगाव धरणावर अवलंबून आहेत. वेवजी, तलासरी, वेवजी, गिरगाव, गिमाणिया, झाई, आच्छाड, संभा तसेच आजूबाजूची गावे उंबरगाव रेल्वे स्थानकाशी जोडली गेलेली आहेत. सुकी मासळी, ओली मासळी, भाजीपाला, दूध, कच्चा माल, व्यापार व नोकरदार हे उंबरगाव रेल्वे स्थानकाशी जोडले गेले आहेत. बोर्डी, झाई भागात पिण्याचे पाणी उंबरगाव येथून येत असते. तर सीमालगतच्या भागातून आठवडा बाजाराच्या खरेदीसाठी लोक महाराष्ट्रात येत असतात. गुजरात राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी वेवजी तसेच डहाणू येथे प्रवास करीत असतात. जीआयडीसीवर डहाणू, तलासरी, जव्हार तालुक्यातून मिनी बसमधून येणारा कामगार वर्ग कामासाठी अवलंबून असून महाराष्ट्रातील हजारो महिला गुजरातच्या कंपनीमध्ये कामासाठी जात आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर व जव्हार हे तालुके आरोग्य सेवेसाठी गुजरात राज्यातील अद्ययावत सरकारी व खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. तर गुजरातमधील मच्छीमार  तसेच लहानमोठे बाजार करणारे व्यवसायिक तलासरी, झाई, बोर्डी, उधवा येथील बाजारावर अवलंबून आहेत. दोन्ही राज्याचे लहान-मोठे व्यवहार तसेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार एकमेकांवर अवलंबून आहेत.गुजरात राज्यातील  उंबरगाव येथील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत दीड किलोमीटर आत घुसखोरी केल्याने  सीमावाद अद्याप चिघळत आहे. वारंवार सीमा घुसखोरीबाबत वादाचे प्रसंग उद्भवूनसुद्धा सीमा निश्चिती प्रत्यक्षात  झालेली नाही.

महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत गुजरात राज्याने घुसखोरी केल्याच्या खलबतांनंतर पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ३ मार्च आणि ४ मार्च रोजी वेवजी सीमेलगतचे सव्‍‌र्हे  नंबर २०३, २०४, २०५, २०६, २०७, २७९ व २८० चे परिसीमेचे मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोलसुंबाची काही बांधकामे वेवजी हद्दीत झाली आहेत. पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक, तलासरी तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सरपंच वेवजी,  सोलसुंभा (उंबरगाव), तलाठी आणि लगतच्या २६ खातेदारांना मोजणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी, अधीक्षक गैरहजर राहिले.  अद्यापही हा विषय तडीस गेला नसल्याने समस्या भेडसावत आहे.

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात भाषिक, सांस्कृतिक, साधम्र्य आहे. सण, उत्सवाला सीमाभागातील शेतकरी, बागायतदारांवर जवळच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळते. चिकू, मिरची, आंबे, झेंडू, अष्टर आदीना उंबरगाव बाजारपेठेत मोठी मागणी असते. या भागात गुजराती भाषेचा प्रभाव अधिक आहे. गुजराती, वाडवळ, धोंडी, आदिवासी, मच्छीमार, भंडारी, मच्छी, मांगेला असे समाज सीमाभागात दोन्ही राज्यात वसलेले आहेत. परस्परांमध्ये नातीगोती, आर्थिक व्यवहार व व्यापार हा नियमितपणे होत असतो. सीमाभागात असंतोष व अशांती निर्माण झाल्यानंतर वेगवेगळय़ा कारणांमुळे किंवा पोलिसांच्या जाचामुळे परस्परांमध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. दोन राज्यांतील सीमा सुस्पष्ट व्हावी, त्यामध्ये सुसूत्रता यावी, दोन राज्यांच्या सीमेवर नागरिकांना विनातक्रार प्रवास करता यावा, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आदानप्रदान टिकवण्यासाठी  दोन्ही राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायती आणि प्रशासनाने एकत्र येऊन  हा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावणे गरजेचे झाले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Definition maharashtra gujarat border unclear gram panchayat administrative boundaries amy