कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी होते आणि चार-पाच किमीच्या रांगा लागतात. त्यामुळे हा तपासणी नाका बंदच करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दापचरी अत्याधुनिक सीमा तपासणी नाका आहे. येथे अवजड वाहने, छोटी वाहने, खासगी वाहने, रुग्णवाहिका अशी अनेक वाहने या रस्त्यावरुन ये-जा करतात. मुंबईत प्रवेश घेण्यासाठी अवजड वाहनांना वेळेचे बंधन घातलेले आहे, त्यामुळे अशी माल वाहून नेणारी वाहने थांबवली जातात. तसेच दापचरी नाक्यावर वाहनांचे वजन काटय़ाचे पैसे रोख स्वरूपात घेतले जातात. त्यामुळे बराच वेळ जातो. योग्य नियोजन नसल्याने इथे रोज वाहतूक कोंडी होते. प्रत्येक मालवाहू गाडीवाल्याला वजनाची पावती आरटीओ कार्यालयात जाऊन दाखवावी लागते. त्यादरम्यान चिरीमिरी दिली-घेतली जात असल्याची कुजबुज आहे. खरे पाहता दंडास पात्र असलेल्या मालवाहू गाडय़ांची माहिती वजनकाटय़ावरच मिळते. मग त्यांना आधीच रांगेतून बाजूला केल्यास बाकीच्या वाहनांना खोळंबून राहावे लागणार नाही, परंतु हा उपाय केला जात नाही. एकूणच नियोजनशून्य कारभारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगेत अडकून वाहनचालक वैतागले आहेत. शिवाय काही वेळा येथे रुग्णवाहिकेलाही थांबून राहावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती असते.
महाराष्ट्राशेजारच्या गुजरात राज्याने तेथील तपासणी नाक्यांवर फास्ट टॅग बसवून घेतल्याने तेथील वाहतुक सुरळीत होते, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. गुजरात राज्याने सीमेवरील भिलाड येथील चेकपोस्टवर फास्ट टॅग बसवून घेतल्याने तेथे आता वाहतूक कोंडी होत नाही.