‘वयम्’च्या मदतीने रामखिंड येथे उद्या आगळा रानभाजी महोत्सव

नीरज राऊत

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी रानभाज्यांचे सेवन महत्त्वाचे ठरत आहे. भाज्यांविषयी जनजागृती करण्यासाठी वयम् या संस्थेतर्फे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत २५ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत आदिवासी मुलांनी रानभाज्यांवर अभिनव प्रकल्प तयार केला असून त्याचे सादरीकरणच या महोत्सवातून होणार आहे.

पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असून सध्या ३१०० पेक्षा अधिक बालके कुपोषित असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शासनातर्फे पुरवले जाणारे कच्चे धान्य हे कुपोषित बालकाला आवश्यक प्रमाणात उपलब्ध होते नसल्याचे तसेच त्याचे बालकांकडून प्रत्यक्षात सेवन केले जात नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. शासनाच्या प्रयत्नांना जोड देण्याच्या उद्देशाने, ‘जे ग्रामीण भागातील सहजगत्या उपलब्ध आहे व बाजारातून विकत घेण्याची गरज नाही,  अशा रानभाज्यांचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वयम् प्रयत्नशील आहे.

गणेशोत्सवाच्या दरम्यान जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील १० ग्रामसभांनी वयम्च्या सहकार्याने आपल्या पाड्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग घेतला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी रानात आढळणाऱ्या सर्व भाजीपाल्याची नोंद केली आणि त्याच्या कमी-अधिक प्रमाणाविषयी चर्चा केली.

या उपक्रमामुळे आपल्या या पारंपरिक वारशाबद्दल मुले चौकस वृत्तीने विचार करत आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. एरवी शाळेत सतत ऐकण्याच्या भूमिकेत असणारी आणि गप्प बसणारी मुलं या उपक्रमामुळे भरभरून व्यक्त होत आहेत. रानभाज्या हा अभ्यास विषय त्यांना माहीत असणारा आहे. त्यामुळे रानभाज्यांची निरीक्षणे, नोंदी, तुलना करणे, विश्लेषण करणे अशा उपक्रमातून मुलांच्या अंगभूत क्षमता वाढत आहेत. यातून समाजात रानभाज्यांचे स्थानही अधिक उंचावेल, असे ‘वयम्’च्या सहसंस्थापिका दीपाली गोगटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. जव्हार, मोखाडा व विक्रमगड या भागात साजरे झालेल्या अशा प्रकारच्या ‘पारंपरिक ज्ञानाच्या उत्सवा’तून सत्त्वयुक्त खाण्याचे प्रमाण वाढेल आणि त्याला प्रतिष्ठाही मिळेल. असे उत्सव कुपोषणाचे प्रमाण कमी करून समाज सुपोषित होण्यासाठी मदतीचे ठरणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

२५ सप्टेंबर रोजी जव्हार तालुक्यातील रामखिंड येथे मुलांतर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याची शक्यता आहे. आपल्या गावासमोर तसेच काही आमंत्रित पाहुण्यांसमोर मुले आपला रानभाज्यांचा प्रकल्प सादर करतील, तसेच आईच्या मदतीने रांधलेल्या चविष्ट रानभाज्या सर्व उपस्थितांना खिलवतील.

४३ रानभाज्या आणि उपलब्धतेच्या नोंदी

आदिवासींच्या या पारंपरिक ज्ञानाचा वारसा मुलांनाही लाभलेला आहेच. वयम्द्वारे शालेय मुलांसोबत ‘उकल’ हा प्रकल्पाधारित शिक्षणाचा प्रयोग केला जात आहे. या उपक्रमांतर्गत रामखिंड येथील मुलांनी गावाजवळच्या रानात मिळणाऱ्या रानभाज्यांवर अभिनव प्रकल्प केला आहे. यात मुलांनी त्यांना माहीत असणाऱ्या तसेच ओळखता येणाऱ्या ४३ रानभाज्यांची यादी करून त्यांचे विविध निकषांवर वर्गीकरण केले आहे. भाज्यांच्या उपलब्धतेच्याही त्यांनी नोंदी केल्या असून भाज्या दुर्मीळ होण्यामागची त्यांना जाणवणारी कारणे नोंदवली आहेत. जीपीएस प्रणालीद्वारे या भाज्या सापडण्याची ठिकाणेही नोंदवण्यात आली आहेत. निवडक भाज्यांविषयी माहिती सांगणारी चित्रफीत मुलांनी तयार केली आहे. तसेच या भाज्यांची पोस्टर्सही बनवली आहेत.