पालघर : केंद्र शासनाने १ जुलै २०२६ पासून देशभर सुरू केलेल्या ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-GRAMG)’ या नव्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय जनसंमेलन व योजना शुभारंभ कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवारी मौजे डोल्हारी बुद्रुक, खोमारपाडा (ता. विक्रमगड) येथे विविध मनरेगा विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांच्या विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यामध्ये जिवब लक्ष्मण टोकरे यांच्या कुक्कुटपालन शेडचे काम, विखुरलेल्या स्वरूपातील वृक्षलागवड, सुनील कान्हा टोकरे यांचा गोठा तसेच अजय अर्जुन टोकरे यांचा गोठा या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हा कार्यक्रम समन्वय अधिकारी (मनरेगा) अतुल पारसकर यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

१ जुलै २०२६ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच टिकाऊ विकासकामांना चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक अंमलबजावणी, ग्रामसभेच्या सहभागातून विकास आराखडे तयार करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

याअंतर्गत गोठे, कुक्कुटपालन शेड, वृक्षलागवड, जलसंधारण, शेततळी यांसारख्या रोजगाराभिमुख आणि शाश्वत मालमत्ता निर्माण करणाऱ्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून, ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ग्रामीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.