रुग्णवाढीच्या दराचा संभ्रम

राज्य आणि जिल्हा सरकारी यंत्रणेतील असमन्वयामुळे दरात तफावत

(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्य आणि जिल्हा सरकारी यंत्रणेतील असमन्वयामुळे दरात तफावत

पालघर : राज्य आणि जिल्हा सरकारी यंत्रणेचे वेगवेगळे निकष आणि समन्वयाच्या अभावामुळे  पालघर जिल्ह्य़ातील रुग्णदरात घट आणि वाढ होताना  दिसत आहे. राज्य शासनाच्या अहवालात रुग्णदरात वाढ तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालात घट दिसत असल्यामुळे अधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.  दरम्यान, जिल्ह्य़ाच्या करोना आठवडा रुग्णवाढीचा दर ९.९ वरून ९.५ टक्क्यावर आला असून  १ जुलैच्या रुग्णदराच्या अहवालावर जिल्ह्य़ाचा निर्बंध स्तर निश्चित होणार आहे.

पालघर जिल्हा प्रशासनाकडून सकाळी आठ वाजता किंवा दहा वाजेदरम्यान संपणाऱ्या २४ तासांपूर्वीच्या करोना रुग्णवाढ,  मृत्यू तसेच उपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येची माहिती देणारा अहवाल सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केला जातो.  वसई- विरार महानगरपालिकादेखील याच पद्धतीने  आपल्या क्षेत्रातील रुग्णांविषयीचा अहवाल प्रसिद्ध करीत असते. या दोन्ही अहवालांमध्ये प्रत्यक्षात रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येते.

मात्र, राज्य सरकारतर्फे तयार करण्यात येणाऱ्या आठवडा सरासरी रुग्ण वाढीचा दराचा हिशेब करताना मध्यरात्री बारानंतरच्या चोवीस तासांदरम्यान वाढलेल्या व राज्याच्या करोना पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या रुग्णांचा विचार केला जातो.  त्यामुळे राज्यातर्फे प्रसिद्ध होणारा रुग्णवाढीचा दर अधिक प्रमाणात असल्याचे  दिसून येते.

शिवाय शहरी भागांतील अनेक नागरिक खासगी प्रयोगशाळेत करोना तपासणी करत असतात. यामध्ये संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्यांची राज्याच्या करोना पोर्टलवर तातडीने नोंद होते. मात्र, हे तपासणी अहवाल प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत  येण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी लागतो.

त्यामुळे राज्य सरकारतर्फे नमूद करण्यात येणारी रुग्ण संख्या आणि रुग्ण वाढीची टक्केवारी ही स्थानिक प्रशासनाच्या टक्केवारीची जुळत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

वाढ आणि घट

२९ जून रोजी पालघर जिल्ह्य़ातील आठवडा सरासरी रुग्णवाढ दर हा ९.९ टक्के इतका असल्याचे राज्य सरकारने दर्शविले होते. मात्र ३० जून रोजी जिल्ह्य़ाला प्राप्त झालेल्या करोना चाचणी अहवालानुसार या टक्केवारीत घट होऊन ती ९.५ टक्कय़ांवर पोहोचल्याचे अहवालामध्ये दिसून आले आहे. जिल्ह्य़ात शासकीय यंत्रणेतर्फे आजाराचा संसर्ग नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाण वाढविले असले तरी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या तपासणीबद्दलची नेमकी माहिती जिल्हा प्रशासनाकडे वेळेत प्राप्त होत नसल्याने आठवडा सरासरी रुग्णवाढ दर टक्केवारी तसेच करोना निर्बंध स्तराबाबत जिल्ह्य़ात गोंधळाचे व अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

ग्रामीण भागांत ९२ नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत ९२ नवीन करोना रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीमध्ये पालघर तालुक्यात ४१, वाडा तालुक्यात १९, विक्रमगड तालुक्यात १४ रुग्णांचा प्रामुख्याने समावेश आहे. पालघर व वसईच्या ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सध्या ८१२ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी पालघर तालुक्यात ३७१, वाडा तालुक्यात २१२, डहाणू तालुक्यात १६७ तर वसईच्या ग्रामीण भागात २८ रुग्णांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Differences in covid patients in palghar due to lack of coordination in state and district administration zws