जादा भाडेदराने प्रवाशांची वाहतूक

पालघर : राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात पालघर विभागही सहभागी झाल्यामुळे बससेवा बंद आहेत. त्याचा गैरफायदा खासगी वाहतूकदारांनी घेतला आहे. एसटी बस बंदमुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांकडून प्रवासासाठी जादा भाडेदर आकारले जात असून प्रवाशांनाही पदरमोड करून खासगी प्रवासी वाहनांनी इच्छीत स्थळी जावे लागत आहे.

पालघरच्या ग्रामीण भागांमध्ये  दररोजच्या दळणवळणाच्या साधनांसाठी एसटी बसचा पुरेपूर वापर केला जातो. मात्र बस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला पदरमोड करून जास्तीचे पैसे मोजून खासगी वाहनांनी जावे लागत आहे. येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही एसटी बसचा मोठा सहारा आहे.  मात्र बंदमुळे काही रुग्णांनी उपचारासाठी जाणे नापसंत केले तर ग्रामीण भागांतून शहरी भागांकडे भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या स्थानिक महिलांनाही एसटीअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

एसटी बस बंद असल्यामुळे खासगी प्रवासी सेवेला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनी त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. एसटी बसच्या तिकीट दरापेक्षा दुप्पट, तिप्पट दर आकारणी करून खासगी वाहतूकदारांची प्रवासी वाहतूक सुरू आहे. प्रवाशांनाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या लुटीला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. सातपाटीसारख्या ग्रामीण भागांमधून एरवी भरभरून येणारी एसटी बंद झाल्यामुळे खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही, असे प्रवासी वर्गाने म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात आठ एसटी आगार मिळून १७९५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पालघर विभागाचे लाखोंचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीवर अवलंबून असलेले नोकरदार,  बागायतदार, विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

संप कायम, प्रवाशी हैराण

वसई :  एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर संप सुरू झाला आहे. याचे पडसाद हे वसई विरारमध्ये उमटले असून वसई तालुक्यातील एसटी आगारात  सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप कायम राहिल्याने प्रवाशीही हैराण झाले आहेत.

एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे शासनाकडून  दुर्लक्ष केले जात असल्याने सोमवारपासून पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  वसई, अर्नाळा, नालासोपारा आगारातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारीही आपल्या संपाची भूमिका कायम ठेवली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विविध कामगार संघटना बाजूला सारत एक कर्मचारी म्हणून या संपात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. कर्मचारी संपावर असल्याने या आगारातून एकही गाडी बाहेर न पडल्याने एसटी सेवेला मोठा फटका बसला आहे. वसई, नालासोपारा, अर्नाळा या तिन्ही आगारातील दररोज लांब व जवळच्या भागातील  फेऱ्या रद्द झाल्याने  प्रवाशांची  गैरसोय झाली. हळूहळू हा संप अधिक तीव्र वळण घेत असून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांचाही मोठा पाठिंबा या कर्मचाऱ्यांना मिळू लागला आहे.  सलग दुसऱ्या दिवशीही एकही एसटी बस धावली नसल्याने     प्रवाशांचा हिरमोड झाला.