डहाणू : डहाणू तालुक्याच्या चिंचणी गावाला जोडणाऱ्या सागरी महामार्गाला कचराभूमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बोईसर एमआयडीसीतून निघणारा घनकचरा या सागरी महामार्गाच्या दुतर्फा टाकला जात असल्याने येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. कारखान्यातील घातक घनकचऱ्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१९८०-९० च्या दशकात तारापूर अणु केंद्रासाठी आणि राष्ट्रीय संरक्षण सिद्धतेसाठी अतिजलद संरक्षण सामग्रीबरोबरच जवानांना तात्काळ पोहोचता यावे म्हणून, केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरीत्या समुद्र किनाऱ्यालगत सागरी महामार्ग निर्माण करण्याचे काम हाती घेतले होते. खाजण तसेच शेती जमिनीतून गेलेल्या या सागरी महामार्गाच्या दोन्ही बाजूला विस्तृत मोठी खाडी असल्याने केरकचऱ्याबरोबरच मृत जनावरे फेकतात. तर रात्रीच्या सुमारास बोईसर एमआयडीसी येथील रासायनिक कचरा या महामार्गाच्या दोन्ही बाजू टाकला जातो. त्यामुळे दिवसभर येथे भटक्या जनावरांचा येथे दिवसभर वावर असतो. त्यामुळे कचरा विखुरला जाऊन दुर्गंधी पसरत आहे.