scorecardresearch

‘रेशनिंग’वरील गहू सडका; प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेअंतर्गत पालघर तालुक्यात निकृष्ट धान्याचे वितरण

केळव्याप्रमाणे हा सडका गहू पालघर तालुक्यात सर्वत्र वितरित झाला असल्याची शक्यता आहे.

‘रेशनिंग’वरील गहू सडका; प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेअंतर्गत पालघर तालुक्यात निकृष्ट धान्याचे वितरण
पालघर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानातून सडके धान्य

पालघर : पालघर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानातून सडके धान्य देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. केळवे येथे हा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेची तपासणी करून तो अहवाल दुकानदार यांनी तालुक्याला सादर करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता केळवे शेतकरी उत्पादन खरेदी-विक्री सहकारी सोसायटीचे केळवे १ आणि केळवे २ अशी रास्त भाव धान्य (रेशनिंग) या दोन्ही दुकानांतून थेट सडका आणि अळय़ायुक्त गहू वितरित करण्यात येत होता.  त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. लाभार्थीनी दुकानदाराला धारेवर धरले होते. तसेच नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे त्यााबाबत तक्रार केली होती.  त्याची दखल घेत केळवे सरपंच यांनी तातडीने दुकानात जाऊन वितरण थांबवले. ३४  क्विंटल गहू सडका आणि अळय़ायुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. आणि चांगल्या प्रतीचे धान्य वाटप झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. पुरवठा निरीक्षक यांनी सडक्या गहूचा पंचनामा केला व तसा अहवाल तालुक्याला पाठवला आहे. पंचनाम्याच्या वेळी दिनेश गवई, विळंगी गावचे उपसरपंच चेतन पाटील,  मयूर राऊत, हर्षल पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, केळव्याप्रमाणे हा सडका गहू पालघर तालुक्यात सर्वत्र वितरित झाला असल्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून सडका गहू लाभार्थीना देणे हा प्रकार घृणास्पद असून ही फसवणूक आहे. गोरगरीब नागरिक व कुटुंबे या धान्यावर अवलंबून असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण धान्य देणे आवश्यक आहे.  – संदीप किणी, सरपंच, केळवे

दुकानदार यांनी या प्रकाराची माहिती दिली नव्हती. मात्र गहू सडक्या प्रतीचे असल्याची तक्रार समोर आल्यानंतर तातडीने पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत पंचनामा करण्यात आला. सडक्या  गहूऐवजी चांगल्या प्रतीचे गहू देण्यात आले आहेत.  – शामली धपाडे, तालुका पुरवठा अधिकारी, पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 04:13 IST

संबंधित बातम्या