scorecardresearch

शाळा सुरू करण्याबाबत परवानगीची प्रतीक्षा

जिल्ह्य़ातील शिक्षण समितीची आज बैठक

शाळा सुरू करण्याबाबत परवानगीची प्रतीक्षा

जिल्ह्य़ातील शिक्षण समितीची आज बैठक

पालघर : एकीकडे  मुंबई महानगरपालिकेने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते बारावी वर्ग सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला   असला तरीसुद्धा पालघर जिल्ह्याने यासंदर्भात अजूनही  निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वीच्या शिल्लक कालावधीत नियोजन कसे करावे, अशी चिंता व्यवस्थापनाला सतावू लागली आहे.  या संदर्भात शुक्रवारी समितीची बैठक होणार आहे. या  बैठकीतील निर्णय जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे राहणार आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या २८० पेक्षा अधिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्ग सुरू आहेत. ग्रामीण भागांत इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागात इयत्ता आठवी ते १२ दरम्यानचे शाळांचे वर्ग ४ ऑक्टोबर पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात शासनाने सूचना जारी केल्या आहेत.

या संदर्भातील आदेश यांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत जिल्हाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पाचवीपासूनच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय समितीमर्फत घेण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी पालघर जिल्ह्यातील समितीची बैठक शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यामुळे समितीच्या बैठकीतील निर्णय जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे राहणार आहे.

शनिवारी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्ताने सुट्टी जाहीर असून ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या होणाऱ्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्र असलेले शाळा बंद ठेवणे गरजेचे होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने या बैठकीचे आयोजन यापूर्वी केले असते तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अधिक सुलभता व सुस्पष्टता आली असतील असे शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संगीता भागवत यांच्याशी संपर्क साधला असता पाचवी ते बारावी चे ग्रामीण भागातील वर्ग सुरु करण्यासाठी बैठकीचे १ ऑक्टोबर रोजी आयोजन केले असले तरीही सर्व संबंधित शाळांना वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी लोकसत्तेला सांगितले.

बैठकीचे आयोजन लवकर का नाही?

पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून करोना काळात अनेक निर्णय घेताना समयसूचकता न दाखवता विलंबाने निर्णय घेतले   गेल्यामुळे शालेय समितीचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांची धावपळ होते. हे काही निर्णयांवर सिद्ध झाले आहे. निर्णय झाल्यास केलेल्या सूचना ग्रामीण भागांत दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांंपर्यंत पोहोचणे कठीण होते हे प्रशासनाला माहित असून सुद्धा तोच प्रकार पुन्हा होत आहे. मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला असताना पालघरसारख्या छोटय़ा जिल्ह्याने निर्णय घेण्यास विलंब का लावला असा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात विचारला जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District education committee meeting today about starting school zws

ताज्या बातम्या