scorecardresearch

जिल्हा पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’

जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये झालेली वाढ व कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न यातून नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने पालघर जिल्हा पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत रात्रभर ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली.

पालघर: जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये झालेली वाढ व कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न यातून नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने पालघर जिल्हा पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत रात्रभर ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शेकडो संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर विविध कलमानुसार काहींना अटक केली. मोटार वाहन कायदयानुसार दंडही आकारला गेला.

पालघर पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेदरम्यान नाकाबंदी, कारवाई पथक व कोम्बिग ऑपरेशन मोठय़ा मनुष्यबळ संख्याने राबवले गेले. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ३४९ पोलीस अंगलदारांच्या सक्रीय सहभागात ही मोहीम राबवली गेली.

हे अभियान पालघर जिल्हयामध्ये प्रथमच अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. या अभियानादरम्यान गुन्हेगांरावर वचक निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये ३२ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकूण २० वस्त्यामध्ये एकाचवेळी कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांसह ५६ पोलीस अधिकारी व ३४९ पोलीस अंमलदारांनी ऑल आउट अभियान राबवले. जिल्ह्यातील वेगवेगळय़ा १६ पोलीस स्थानकांमध्ये ३२ ठिकाणी नाकेबंदी तर २० ठिकाणी कोम्बिग ऑपरेशन राबवले गेले. या ऑपरेशन दरम्यान गुन्हे दाखल असलेले ९३ आरोपी (हिस्ट्रीशीयर), विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले १६ आरोपी व सराईत चोरी करणारे ६२ गुन्हेगार पोलिसांच्या हाताला लागले आहेत यापैकी २७ जणांना पोलिसांनी वॉरंट बजावले आहे. याच वेळी दारूबंदी कायद्यानुसार ३२ गुन्हे दाखल करून नऊ लाख ५३ हजार ६५८ रुपयांचा मुद्देमाल एका दिवसात जप्त केला आहे. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या अकरा जणांवर पोलिसांनी या दरम्यान गुन्हे दाखल केले व इतर गुन्ह्यात विविध कलमानुसार १२९ जणांवर कारवाई करण्यात आली.

ऑपरेशनमध्ये सहभागी पोलीस

पोलीस अधीक्षक १, अपर पोलीस अधीक्षक १, उपविभागीय पोलीस अधिकारी-५, पोलीस निरीक्षक १०, सहा. पोलीस निरीक्षक १३, पोलीस उपनिरीक्षक- २६, पोलीस अंमलदार ३४९

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District polices operationallout laworder penalties law amy