हॉटेल, रिसॉर्टला भरघोस प्रतिसाद; कुटुंबांच्या आरक्षणाला प्राधान्य

पालघर : गतवर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज झाला आहे. किनारपट्टीच्या तसेच विविध ठिकाणी असणाऱ्या हॉटेल व रिसॉर्टमधील निवासी आरक्षण जवळपास पूर्ण होण्याच्या स्थितीत आहेत. नववर्षांचे स्वागत करण्यासाठी शनिवार-रविवार दिवस लागून आल्याने गेली दोन वर्षे मरगळीत असणारा हॉटेल व्यवसायाला नव्याने तेजी आली आहे. किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या लहान-मोठय़ा हॉटेल तसेच खासगी निवास व्यवस्थेच्या ठिकाणी मुंबई, ठाणे व गुजरात भागातील नागरिकांनी  गतवर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी नियोजन केले आहेत. पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी उघडय़ावर मद्यपान करणाऱ्या नागरिकांविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने  कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर युवकांच्या गटांना हॉटेल आरक्षण देण्याऐवजी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी निवासी नोंदणीसाठी कुटुंबांना प्राधान्य दिले आहे.  केळवे येथील अनेक हॉटेलमधील ७० ते ८० टक्के रूमची नोंदणी झाल्याचे  सांगण्यात येत असून पुढील दोन दिवसांत हॉटेलची संपूर्ण निवासव्यवस्था आरक्षित होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उघडय़ावर मद्यपान करण्यासाठी किंवा मद्यविक्री करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट मालकांना एकदिवसीय मद्य परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र त्यासाठी सुमारे २० हजार रुपयांचा खर्च येत असल्याने असे परवाने घेण्यास बहुतांश हॉटेल मालक तयार नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करता येणार नाही अशा सूचना येणाऱ्या पर्यटकांना देण्यात येत आहेत.

नाताळच्या सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे फुलून निघाले होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार ते रविवार जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळेल अशी शक्यता आहे. करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अशा गर्दीवर नियंत्रण ठेवणे किंवा पर्यटकांच्या दृष्टीने सोयी-सुविधा उपलब्ध करणे  हे स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आव्हान  असणार आहे. अलीकडच्या काळात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना मद्यपान करण्याचा कल वाढला असून समुद्रकिनारी असणाऱ्या रिसॉर्टला सीआरझेड नियमांमुळे अकृषिक परवानगी मिळत नाही. त्यामुळे अशा रिसॉर्टना कायमस्वरूपी मद्य परवाना घेण्यास अडथळा निर्माण होत आहेत. त्यामध्येच उत्पादन शुल्क विभागाकडून पर्यटन क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित केले जात असल्याने पर्यटन तसेच हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले आहेत. परिणामी आपल्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्यास कारवाई होऊ शकते यामुळे हॉटेल व्यावसायिक मंडळी धास्तावली आहेत.

उघडय़ावर मद्यसेवनाकडे दुर्लक्ष

दुसरीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बीअर शॉपीना परवानगी दिली गेली असताना त्यालगत असणाऱ्या खानपान व्यवसायाच्या ठिकाणी राजरोसपणे उघडय़ावर मद्यसेवन केले जाते असा आरोप करण्यात येत असून अशा ठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पर्यटनाला चालना देताना आवश्यक परवाने मिळण्यासाठी शासनाने सुलभता आणावी अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

गर्दीवर नियंत्रण अशक्य

चिंचणीसह केळवे, शिरगाव, बोर्डी, दातिवरे आदी भागांमध्ये नाताळ दिनी २५ डिसेंबर रोजी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केल्याचे दिसून आले. अशा गर्दीवर नियंत्रण ठेवणे स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेला कठीण होत आहे. त्यामुळे आठवडाअखेरीस येणाऱ्या नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने पुन्हा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी उफळून येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.