पालघर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही मोहीम राबवली जात आहे. रविवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून या दिवशी झालेल्या ग्रामसभांच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांकडे एक हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ही मोहीम १ मे पर्यंत राबवली जाणार आहे.
कृषीसह पशुपालन, शेती पूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय अशा पद्धतीचे व्यवसाय करताना शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये व ते इतर कर्ज घेऊन आर्थिक बोजाखाली दबू नये यासाठी अल्प व्याजदरावर किसान क्रेडिट कार्ड त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे कमी व्याजदरात शेतकऱ्यांना चांगल्या रकमेचे कर्ज प्राप्त होईल व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून ही कार्ड योजना त्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी व्यक्त केला आहे. सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या यंत्रणाच्या समन्वयाने मोहीम राबविण्यात येत आहे.
रविवारी जिल्ह्यात विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या विशेष व बाल ग्रामसभांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देऊन एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज जमा केले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांकडून आणखीन शेतकऱ्यांचे अर्ज घेण्याचे काम सुरू आहे. एक मेअखेर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीवर्ग या कार्ड योजनेत लाभार्थी होतील, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनाअंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषी विभागाने रविवारी आयोजित केलेल्या ग्रामसभेत पीक विमा योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत गावनिहाय पीक विमा पाठशाळाचे आयोजन करण्यात येणार आहे. पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक किशोर पडघन यांनी केले आहे.
काय आहे किसान कार्ड योजना
योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी वर्गापासून ते जास्तीत जास्त शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड घेता येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड हे अल्प व्याजदरांमध्ये कृषी, कृषी पूरक, पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते. कार्डद्वारे मिळालेले कर्ज एक वर्षांत परतफेड केल्यानंतर पुढील वर्षांत कर्जफेड केलेल्या रकमेपैकी दहा टक्के वाढीव कर्ज रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते. कर्जासाठी किमान तीन टक्के इतका व्याजदर आहे. लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार व कर्ज रकमेनुसार हा व्याजदर बदलतो. पाच वर्षांसाठी हे कार्ड बँका मंजूर करतात. दरवर्षी बँकेत जाऊन ते कार्ड पुनरुज्जीवित करावयाचे आहे. नाबार्डमार्फत एक पानी अर्ज व कमी कागदपत्रात हे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी आहे.