दिवाळी उत्सवात आदिवासींच्या परंपरेचा साज ; वाघ्या देवताचे पूजन

ग्रामीण भागांत आदिवासी समाजात दिवाळी सण पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. 

कुटुंबाला एकत्र बसून चवळी, सावेली, करांदे खाण्याचा कार्यक्रम

नितीन बोंबाडे, लोकसत्ता 

डहाणू : परंपरा आणि संस्कृती म्हणून दिवाळी सणाला आदिवासींच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.  आदिवासी पाडय़ांवर  बारस, तेरस, चावदस आणि पूनम अशी चार दिवस चालणारी पारंपरिक दिवाळी यंदाही साजरी केली जात आहे.   आदिवासींच्या दिवाळी सण हा वाघबारसवरून ठरत असतो. यावेळी वाघ देवाचे स्मरण करून ‘जंगलात फिरताना रक्षण कर, कुठलीही इजा करू नको’ आमची लक्ष्मी आहे हे तुमचं लक्ष होऊ  देऊ  नको अशी प्रार्थना केली जाते ती यंदाही केली जाणार आहे.

ग्रामीण भागांत आदिवासी समाजात दिवाळी सण पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते.  करंजी, लाडू, चकली आदी खाद्यापदार्थाची रेलचेल येथे नसते. त्या ऐवजी  चवळी, नारळ, वालुक, करांदे, करवेली गुरकोहला, साखर कोहला यांचा स्वाद असतो. या खाद्यसामुग्रीचे आदी पूजन केले जाते. बारशीनंतर तेरस, चवदास, आणि पूनम असे चार दिवस आदिवासींच्या जीवनात भरभरून आनंद देणारे असतात.  या दिवसांत घरातील ज्येष्ठांकडून  कुल देवतांना दुधाने अथवा तांदुळाच्या पाण्याने स्नान घातले जाते.  बारस करता तेव्हा कुलदैवत हिरवा, हिमाय, बहरम आणि इतर जे देव असतात त्यांना शेंदूर लावून प्रत्येक कुटुंबातील लोकांनी आणलेलं नवीन कुडय़ाचे भात (लाल भात ) देवाच्या मावटीत भरतात.  गेल्या वर्षीचे मावटीतील भात कुलदेवाला जमलेल्या सर्व कुटुंबातील लोकांना थोडंथोडं वाटून देतात. तसेच देवांची टोपली शेणाने सारवली जाते. हिरवा, हिमाय, नारन, बरान या देवांना शेंदूर लावला जातो. गाय वागुलला शेंदुर लावतात. घर लालमाती, शेणाने सारवतात. 

भात कापणीसह शेतीची सर्व कामे पूर्ण झाल्याने शेती मोकळी होते.  त्या दिवसापासून  गुरांना बांधून न ठेवता त्यांची पूजा केली जाते.  गेरूने शिंग रंगवतात, पाठीवर हाताचे ठसे मारतात आणि तेव्हापासून त्यांना गोवारीशिवाय चरायला सोडतात. पावसाच्या कालावधीत गाय -बैल भातशेतीत घुसू नये म्हणून गोवारींना नेमले जाते. ते या गुरांचा सांभाळ करत असतात. या दिवशी या गोवारींनाही सुट्टी दिली जाते.

तारपा नृत्य

आदिवासी तारपकऱ्याच्या ‘चाल्यावर’ तारपा नाचायला आपल्या पाडय़ात निघतात तारपकरी  तारप्यावर वेगवेगळी चाल वाजवतात.  घोरकाठीच्या तालावर   तारपा नृत्य केले जाते.     देव, रानोडी, टाले, चवले,  जोडे, नवरे,  मुऱ्हा (मोराचा), ऊस, सलाते,  लावरी, थापडी तसेच उसळ्या आदी चाल्यांचा नाच असतो. दोन दिवस ‘डुहूरली’ करून बेधुंद नाचतात.

खाद्योत्सव वाघ्या, गाव देव पूजल्यानंतरच लग्नाचा व्यवहार केला जातो. दुसऱ्या दिवशी चायची किंवा कोहरेलोचे पानात काकडीच्या सावेल्या बाफल्या जातात. संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून त्या हातामध्ये देऊन एकत्रपणे खाण्याचा हा उत्सव असतो.  वालुक पीठ-साखर टाकून या दिवशी ‘गोड भाकर’   खाण्याचा कार्यक्रम असतो.  जी भाकर पीठ, वालुक (गावठी काकडी), चवळी, साखर यांपासून तयार केली जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 traditional diwali celebrated in tribal community this year zws

ताज्या बातम्या