जव्हार नगर परिषदेतील अंदाजपत्रकावरील बनावट सह्य़ा प्रकरणात वाढ

नीरज राऊत
पालघर : जव्हार नगर परिषदेमधील श्री शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरण करण्यासाठी तयार अंदाजपत्रकावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्य केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. असाच प्रकार १४ कोटींहून अधिक रकमेच्या ४९ कामांच्या बाबतीत घडला असल्याचा संशय निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांंपासून अशाच पद्धतीने कामे सुरू असल्याचे  एका नगरसेविकेने मुख्याधिकारी व स्थनिक निधी लेखापरीक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

एक कोटी ५९ लाख रुपयांचे जव्हार नगर परिषदेमधील उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेणे अपेक्षित असताना बनावट सह्य़ांच्या आधारे तांत्रिक मंजुरीची  कागदपत्रे तयार  केल्याचे प्रकरण नुकतेच पुढे आले आहे. त्यानंतर १४ कोटींच्या कामांचे असेच एक प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने नगर परिषदेच्या कारभार टीका सुरू झाली आहे. याबाबत दीड वर्षांपूर्वी जव्हार येथील काही नगरसेवकांनी उपोषण केले होते. त्या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापन समितीच्या चौकशीनंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे  नगरसेवकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची विशेष लेखापरीक्षण करण्याची व जिल्हाधिकारी यांनी या गैरव्यवहार प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

अनियमिततेचा प्रकार

’ अंदाजपत्रकावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्याऐवजी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खोटी सही करून तांत्रिक मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार करणे.

’ काही कामे पूर्ण आणि देयकांची रक्कम अदा केल्यानंतर त्या कामांकरीत तांत्रिक मंजुरी शुल्क भरणे.

’ काही कामांची देयके अदा केल्यानंतर देखील तांत्रिक मंजुरी शुल्क भरणा न करता प्रशासकीय मंजुरी मिळविणे.

विक्रमगडमध्येही गैरप्रकार?

विक्रमगड नगरपंचायतमध्ये होणाऱ्या विकासकामांबाबतही खोटय़ा सह्यंच्या आधारे  कागदपत्रे तयार करून तांत्रिक मंजुरी करून  विकासकामे मार्गी लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारांचीदेखील चौकशी करण्यात यावी व सार्वजनिक कामांसाठी असलेल्या विकासनिधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.

दाखल तक्रारीची सद्यस्थिती

जव्हार नगरपरिषदेतर्फे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करत असल्याचे जव्हार पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता सांगितले. चौकशी व आवश्यक पुरावे गोळा केल्यानंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान पोलिसांकडून धीम्यागतीने तपास होत असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची कुजबूज जव्हारमधील नागरिकांमध्ये होत आहे.