पालघर जिल्हयातील अनेक तालुक्यांना त्यातील काही गावांना ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु कालांतराने इतिहासाच्या खाणाखुणा लोप पावत चालल्या आहेत. त्याच्या नोंदी विखुरल्या गेल्या आहेत. त्या एकत्रित आणणे आज गरजेचे आहे.  ते आणले गेले तर ते येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल हे उद्दिष्ट ठेवून  डॉ. प्रा. प्रेरणा राऊत यांनी डहाणू तालुक्यातील चिंचणीच्या इतिहासाचे दालन पुस्तकरूपाने सर्वासाठी खुले केले आहे. ब्रिटिश विरोधी संघर्षांत चिंचणीचा सहभाग याचा विस्तृत आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून डॉ. प्रेरणा शैलेंद्र राऊत यांनी लिहिलेल्या ‘चिंचणीचा इतिहास’ या ग्रंथाचे प्रकाशन चिंचणीच्या पी.एल. श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पार पडले.    माजी मुख्याध्यापक हर्षवर्धन जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यावेळी उपस्थित होते. प्रा. प्रेरणा राऊत यांना लिहिलेल्या ‘पालघर आणि डहाणू तालुक्यातील ब्रिटिश राजवटीचा इतिहास (१८५७- १९४७)’ या विषयावर लिहिलेल्या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने ‘विद्या वाचस्पती’ (पीएचईडी) ही पदवी दिली आहे. या प्रबंध लेखनासाठी के.व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अनुराधा रानडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

कायदेभंग, चलेजाव चळवळीत सहभाग

मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशात ब्रिटिशांची राजवट प्रस्थापित झाली. या राजवटीला सुरुवातीच्या काळात विरोध न करता येथील जमीनदार व सावकार यांनी नव्या राजवटीचा फायदा स्वहितासाठी करून घेतला. परंतु कालांतराने ब्रिटिशांनी उपलब्ध केलेल्या शैक्षणिक व इतर सुविधांमुळे या प्रदेशात  स्वहिताच्या जाणिवा सजग होऊ लागल्या. टिळकांच्या केसरीचे वाचन येथील सुशिक्षितांनी सुरू केले.  परिणामी महात्मा गांधींच्या कायदेभंग चळवळ, चलेजाव चळवळ यामध्ये येथील लोकांनी सक्रिय भाग घेतला. राष्ट्रीय सेवा दलाची संचलने, गांधी विचारांच्या प्रचारासाठी भरवल्या जाणाऱ्या शिबिरामधील सहभाग यामुळे चिंचणीमध्ये स्वातंत्र्य चळवळ सक्रिय बनली. चिंचणीमधील सर्वच जाती धर्मामधील लोक चळवळीत सहभागी होते.  स्वातंत्र्याचा महोत्सव  साजरा करण्याची परंपरा चिंचणीत कायम झाली.

मध्ययुगीन काळातील वास्तू, वसाहती

चिंचणीमध्ये सोलंकी व यादव कुलीन बिंब राजे, गुजरात सुलतानांच्या राजवटी, मुगल, पोर्तुगीज, मराठे यांचे आधिपत्य होते. बिंब राजांनी या परिसरातील नागरिकांना दिलेले अधिकार राजवटी बदलल्यानंतरही परंपरेने जोपासल्या गेल्या आहेत. चिंचणीत सापडलेली गुजरात सुलतानांची नाणी तसेच  येथील खाडीकिनारी व समुद्र किनारी गुजरात व राजस्थानातून व्यापाराच्या निमित्ताने स्थलांतरित होऊन आलेल्यांच्या मुस्लीम वसाहती, चिंचणी व परिसरातील किल्ले, बुरूज, घोडविहिरी येथील हवेली मंदिरे, पुरातन शिवमंदिरे, मध्ययुगीन काळातील व्यापाऱ्यांची घरे हे मध्ययुगीन काळातील चिंचणीमधल्या स्थित्यंतराचे पुरावे आहेत. 

तीर्थक्षेत्र, सातवाहन ते शिलाहाराच्या राजवटी

कथासरित्सागर या ग्रंथातील उल्लेखानुसार प्राचीन काळात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारी चिंचणी, जादू विद्याची नगरी होती. येथील लोककथा, लोकगीते, वालुकामय दगडावर कोरलेले शिल्पाकृती हे चिंचणीच्या प्राचीनत्वाचे पुरावे आजही आहेत. चिंचणीत सातवाहन, शक क्षत्रप, राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या राजवटी होत्या त्याची सिद्धता येथे उपलब्ध झालेली मृदा भांडी, नाणी, राष्ट्रकूट कालीन चिंचणी ताम्रपट, बांधकामाच्या अवशेषातून विटा, नांदीच्या विहिरी यातून स्पष्ट होते याची माहिती पुस्तकातून मिळते.