पालघर : पालघर येथे जुना मनोर रोड येथे रस्त्याचे काम सुरू असून घोलविरा या भागात असलेल्या नाल्याच्या शेजारच्या इमारतीची भिंत अचानक कोसळली. रस्ता खोदकामा दरम्यान सतत सुरू असणारे कंप तसेच नाल्याला दोन्ही बाजूने संरक्षण भिंत नसल्याने इमारतीची भिंत कोसळल्याचा आरोप या इमारतीतील रहिवाशी करत आहेत. नगरपरिषदेने नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती बांधाव्या अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
घोलवीरा परिसरात गेल्या दोन महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे. या भागात वाहणाऱ्या नाल्याच्या दक्षिणेला दुतर्फा इमारती आहेत. तर गेल्या महिन्याभरापासून उत्तरेच्या दिशेने 300 मीटर लांबीची व तीन मीटर उंचीच्या एका संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. मात्र दक्षिणेच्या दिशेला संरक्षण भिंत नसल्याने दोन्ही दिशेच्या इमारतीच्या भिंती मधून नाल्यातील पाण्याचा विसर्ग सुरू असतो.
गेल्या अनेक वर्षापासून नाल्यातील साचलेल्या पाण्यामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे भिंती लगतची माती खचून भिंत कमकुवत झाल्याचा आरोप शुभांगण ग्रीन्स इमारतीमधील रहिवाशांनी केला आहे. तर संबंधित इमारतीच्या विकासकाशी रहिवाश्यांनी संपर्क साधला असता इमारतीला नऊ ते दहा वर्षे झाले असून याची जबाबदारी आता आमची नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संबंधित भिंत ही अंदाजीत मध्ये नसून प्रमाणात जेवढे शक्य आहे तेवढे काम सुरू आहे. नियोजित काम झाल्यावर बघू असे सांगण्यात आले.
नाल्याला संरक्षण भिंत आवश्यक असते. मात्र संरक्षण भिंत नसल्याने इमारतीच्या भिंतीवर नाल्याचा प्रवाह अवलंबून असतो. पावसाळ्यात पाणी भरल्यावर अनेक समस्या उद्भवतात. नगर परिषदे कडून रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातूनच आमच्या इमारतीच्या भिंतीची दुरुस्ती नगरपरिषदेने करून द्यावी. संभाजी वाघमोडे, रहिवासी
संरक्षण भिंत का आवश्यक
नाल्याला संरक्षण भिंत आवश्यक आहे. ही भिंत नाल्याला पाणी ओव्हरफ्लो झाल्यास, पाण्याचा मार्ग बदलण्यास मदत करते आणि परिसरातील घरांना आणि मालमत्तेला पूर येण्यापासून वाचवते. नाल्याला संरक्षक भिंत नसल्यास पाण्याचा प्रवाही बदलू शकतो, ज्यामुळे परिसरातील लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. नाल्याला संरक्षक भिंत बांधल्याने पूर येण्याची शक्यता कमी होते. ओव्हरफ्लो झाल्यास पाणी भिंतीमार्फत नियंत्रित दिशेने वळवले जाते, ज्यामुळे परिसरातील घरांना आणि मालमत्तेला धोका कमी होतो. नाल्याला संरक्षक भिंत असल्याने नागरिक सुरक्षित राहतात. त्यामुळे सामाजिक सुरक्षितता वाढते.