बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून अपूर्ण कामांमुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नियमित पावसाळ्याच्या तोंडावर तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर सरावली परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नवापूर, कुंभवली आणि मधुर चौक ते मुकुट टॅंक या रस्त्यांच्या दोन्ही मार्गिकांचे खोदकाम करून त्या ठिकाणी आलटून पालटून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
एमआयडीसीतील रस्ते आणि बंदिस्त गटारे यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामास ठेकेदाराला तीन वर्षाची मुदत देण्यात आली असली तरी हाती घेतलेली कामे पावसाळ्याच्या आधी मे महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण करून खोदकाम करण्यात आलेला रस्ता वाहतुकीस पूर्ववत आणि सुस्थितीत करून देण्याची अट आहे. मात्र व्यवस्थित नियोजनाच्या अभावामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळ्याच्या तोंडावर देखील ठेकेदाराकडून सुरू करण्यात आलेली कामे अपूर्ण असून यामुळे नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी खड्डे पडून तसेच पावसाचे पाणी तुंबल्याने चिखल निर्माण होऊन वाहन चालकांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे.
बोईसर मधील गेली अनेक वर्षे रखडलेल्या सिडको बाह्यवळण मार्गाच्या कामात झाडांच्या अतिक्रमण आणि सिडकोचा अडथळा निर्माण झाला आहे. झाडांचे अतिक्रमण काढण्यास रस्त्याशेजारील घर मालकाचा विरोध आहे तसेच सिडको प्रशासनाने देखील ना हरकत दाखला घेतल्याशिवाय काम सुरू करण्यास हरकत घेतल्याने रस्त्याचे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. काँक्रिटीकरणासाठी सिडको बाह्यवळण रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा पर्यायी मार्ग देखील बंद झाला असून यामुळे राजमाता जिजाऊ चौकाकडून दूरचा वळसा घालावा लागत असल्याने वाहन चालकांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.
सुरक्षित उपाययोजनांकडे दुर्लक्ष
तारापूर औद्योगिक परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकारणाची कामे सुरू आहेत. कंत्राटदाराला रस्ते, गटार आणि पदपथांची कामे पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बोईसर ते नवापूर आणि यशवंत सृष्टी फाटा ते डीसी कंपनी पर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे सुरू असताना वाहतूक सुरळीत राहावी याकरिता प्रथम एका वाहिनीचे काम पूर्ण करून त्यानंतर दुसऱ्या वाहिनीचे काम करण्यात येत आहे. मात्र काम सुरू असताना वाहतूक नियंत्रणाचे कोणतेही नियोजन वाहतूक शाखा आणि कंत्राटदारामार्फत करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
यशवंत सृष्टी फाटा ते डीसी कंपनीपर्यंतच्या एका वाहिनीचे काम सुरू असून येणारी जाणारी सर्व वाहतूक दुसऱ्या वाहिनीवरून सुरू आहे. एका बाजूकडील वाहतूक सुरू असताना दुसऱ्या बाजूकडील वाहतूक थांबवणे अपेक्षित आहे. मात्र दोन्ही बाजूंना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्मचारी नसल्याने दोन्ही बाजूकडील वाहने समोरासमोर येऊन वाहतूक कोंडी सोबतच वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. काम सुरू असलेल्या बऱ्याच ठिकाणी सावधानतेचे फलक, बॅरिकेडस इत्यादी सुरक्षित उपाय नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहने रस्त्याखाली उतरून अपघात होत आहेत. काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांकडून एमआयडीसीकडे करण्यात येत आहे.
तारापूर एमआयडीसी क्षेत्रात सुरू असलेली रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटारांची कामे १५ जून पासून पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाळ्यात वाहन चालकांना त्रास होऊ नये यासाठी खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. – अविनाश संखे, उपअभियंता (स्थापत्य), तारापूर एमआयडीसी.