पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरवून सोडले आहे. भूगर्भातून येणारे मोठे आवाज आणि धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

१० जानेवारी रोजी जव्हार शहरासह लगतच्या परिसरात एकापाठोपाठ एक असे तीन धक्के जाणवले. केवळ धक्केच नव्हे तर भूगर्भातून भीतीदायक आवाजही येत असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. १० जानेवारी रोजी दुपारी १:४६ वाजता, संध्याकाळी ७:१० वाजता व रात्री ११:१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

जव्हारचे निवासी नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकृत अहवाल सादर केला आहे. यशवंत नगर, मोर्चा आणि जांभूळविहीर या भागात हे धक्के प्रकर्षाने जाणवले. सुदैवाने, या नैसर्गिक हालचालींमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. पालघर जिल्ह्यासाठी भूकंपाचे धक्के नवीन नाहीत. यापूर्वी २०१८ पासून डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये सातत्याने भूकंपाचे सत्र सुरू होते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत अशा प्रकारचे धक्के बसण्याचे प्रमाण या भागात आधीही दिसून आले आहे. जव्हारमध्येही यापूर्वी अशा घटनांची नोंद झाली आहे.