पालघर/डहाणू : माथेरान, महाबळेश्वरप्रमाणे पर्यावरण संवेदनशीलतेसाठी असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी आपण प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डहाणू येथे नागरिकांना दिले. दि डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या नवीन वास्तूचे उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या वेळी खासदार राजेंद्र गावित आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा, नगराध्यक्ष भरत राजपूत आदी उपस्थित होते. १९३७ साली बँक ही पतसंस्था स्वरूपात सुरू होती. १९७९ झाली बँकेने पहिल्यांदा इमारत उभारली होती. जीर्ण झालेल्या बँकेच्या इमारतीचे विस्तार करताना सागर नाका परिसरात बँकेने नवीन इमारत उभारली आहे.
डहाणू परिसरालाच पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील ठरवले आहे. त्यातच लादलेल्या निर्बंधांमुळे उद्योगबंदीसह विकासाची दालने खुंटली आहे, अशी व्यथा अनेक नागरिक व नेत्यांनी मांडली होती. त्याविषयी राज्यस्तरीय अधिकाऱ्याशी चर्चा, आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा तसेच डहाणूच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे अजित पवार यावेळी म्हणाले. जिल्ह्यात फळबाग, भाजीपाला व कृषी उद्योग भरभराटीत असताना पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक रिक्त पदे भरून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी वेगवेगळय़ा संस्था, नागरिक यांनी मागण्यांची निवेदने दिली. त्यासंदर्भात येत्या आठवडय़ात पाठपुरावा करू असे पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील समस्या व विकासकामांचा आढावा घेतला.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्हा बँकेचे विभाजन करून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र बँक करण्याची मागणी परवडणारी नाही. जिल्ह्य़ाला आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय जिल्हा बँकेचे विभाजन करणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसी आरक्षणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे अजित पवार या वेळी बोलले.
दरम्यान, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी आघाडी सरकारमधील प्रत्येक घटक पक्षाला आपल्या संघटनेच्या वाढीचा अधिकार असल्याचे सांगून पक्ष संघटनेने स्थानिक पातळीवर नियमित बैठका घेऊन पक्षाची बांधणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पक्षांतर्गत पदे उपभोगून कुरघोडी करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी संकेत दिले.
‘जातीय सलोखा राखा’
श्रीलंका, युक्रेन, पाकिस्तान येथील परिस्थिती गंभीर असून देशात जातीय सलोखा राखणे आवश्यक असल्याचे सांगितले.आपण आपल्या धर्माचे पालन करताना त्याचे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे सांगत ध्वनिक्षेपक, कीर्तन, भजन, काकड आरती करण्यावरून राजकीय लाभ घेणाऱ्या मंडळींवर नाव न घेता टीका केली.