पालघर: पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी वाढवण बंदर सारखा प्रकल्प उभा राहत आहे. तसेच समुद्र किनारपट्टीवर उभ्या राहत असलेल्या जिंदाल बंदरामुळे मच्छीमार बांधवांचे नुकसान व अन्याय होणार नाही. त्यांच्या विरोधात जाऊन कोणताच प्रकल्प होणार नाही, भकास करून विकास करणार नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेदरम्यान केले.
पालघर नगर परिषद क्षेत्रातील नगराध्यक्षा पदाकरिता व 30 नगरसेवक पदाकरिता उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता एकनाथ शिंदे आज पालघर येथे आले होते. पालघरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरात यांनी या अगोदर उपनगराध्यक्ष पदाचा चौकार मारला असून आता पाचव्यांदा डायरेक्ट नगराध्यक्ष पदावर बसवण्याची जबाबदारी पालघर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांची असल्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
आपण मुख्यमंत्री असताना राज्यात तसेच पालघर जिल्ह्यात अनेक विकासाचे प्रकल्प सुरू केले आहेत. शिवसेनेचा अजेंडा हा फक्त विकास करणे आहे. मुंबई येथे वर्सोवा ते विरार सिलिंक आणले, गृह खाते, नगर विकास खात्याच्या माध्यमातून डहाणू पर्यंत विकासाची गंगा आणत असून एमएमआरडीएचा माध्यमातून विकास करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे – पालघर जुळी भावंड
आनंद दिघे यांचा ठाणे हा बालेकिल्ला होता. मात्र ठाण्यापासून पालघर वेगळे झाले असले तरीही हे दोघं जुळी भावंड आहेत. ठाण्यासारखाच पालघरच्या विकासाला देखील निधी कमी पडू देणार नाही. नगरपरिषदेची पूर्वीची इमारत धोकादायक झाली होती. यामुळे नवीन इमारतीला 28 कोटी निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासह पालघर जिल्ह्यात नाट्यगृह नसून ठाण्यासारखेच नाट्यगृह पालघर जिल्ह्यात देखील लवकरच उभे करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
