पालघर : ‘महाराष्ट्रातील मतदारांसाठी सुरतेत साडीलूट’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग झाला आहे का, याबाबत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दररोज एक लाख साड्या सुरत येथून राज्यात आणल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. १०० रुपयांच्या जवळपास किमतीच्या सुरती बनावटीच्या साड्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वाटल्या जात असल्याचा उल्लेख वृृत्तामध्ये होता.
या वृत्ताची राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना २४ नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे दिल्या आहेत. अशा प्रकारच्या साड्यावाटपामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहितासंदर्भातील आदेशाचा भंग होत असल्याबाबत चौकशी करून त्यासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अथवा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच साड्यावाटप झाल्याचे दिसून आले आहे. तसेच वेगवेगळ्या खेळांच्या अथवा स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या महिलांना साड्या देण्याचे प्रकार घडल्याची माहिती पुढे येत आहे. साड्यांचे वितरण करण्यात आले तेव्हा आचारसंहितेचे उल्लंघन झाले होते का, याची पाहणी करण्यासंदर्भात पथक स्थापन केले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन अधिक दक्ष राहील व आचारसंहिता भरारी पथक कार्यक्षम पद्धतीने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अहवाल सादरीकरणाचे आदेश
पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.
