पालघर : पालघर जिल्ह्यतील ४६ ग्रामपंचायतीच्या ९६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २१ डिसेंबर रोजी या पोटनिवडणुका होणार असून त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी घोषित होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गाची अतिरिक्त रिक्त जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची सुधारणा २२ नोव्हेंबपर्यंत केली जाणार आहे. तर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या रिक्त जागांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. ७ डिसेंबर सकाळी ११ वाजेपासून दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. ९ डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र उमेदवारांना मागे घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे.

ज्या ग्रामपंचायती क्षेत्रात करोना रुग्ण संख्या नगण्य आहे, अशा ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया पार पाडावयची  आहे. याचबरोबरीने  ज्या ग्रामपंचायतींची  मुदत संपण्यासाठी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेतली जाईल. नागरिकांचा मागास प्रवर्गतील रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण ५०टक्क्यांपर्यंत मर्यादित असावे व या प्रवर्गाचे एकूण आरक्षण २७ टक्के ठेवावे असे निवडणूक आयोगामार्फत सांगण्यात आले आहे.

ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायतींच्या सदस्य वर्गाची संख्या सात एवढी असेल त्या ठिकाणी एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असेल. जेथे नऊ सदस्य संख्या आहे तेथे दोन जागा, अकरा सदस्य संख्या असेल तिथे दोन जागा, तेरा सदस्य संख्या असेल तिथे तीन जागा, १५ सदस्य संख्या असेल तिथे चार जागा व १७ सदस्य संख्या असेल तिथे चार अशा आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी व गणना करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिलेले आहेत. याच बरोबरीने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अतिरिक्त ठरणाऱ्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाला आरक्षित केल्यानंतर महिलांसाठी आरक्षित जागांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या ५०टक्के राखली जाईल याची दक्षता जिल्ह्याने घ्यावयाची आहे, असे आदेशात म्हटले आहे.