राष्ट्रीय महामार्गालगत जमिनींवर बेकायदा बांधकामे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन बोंबाडे

डहाणू: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत  आदिवासी कातकरी  समाजाच्या जमिनींवर भूमाफियांनी  मोठय़ा अतिक्रमण केले आहे.  शासनाकडून उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या या जमिनी भूमाफियांच्या दावणीला बांधल्या जात  असताना ग्रामपंचायती, तलाठी, महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

डहाणू तालुक्यात महामार्गालगत मनोरज नजीकच्या नांदगाव, आव्हढणी, मस्तननाका, टकावहल तसेच कासा, चारोटी , घोळ, तवा, धूंदलवाडी, जामशेत , वाणगाव, वेती वरोती, आशागड, आसवे,गंजाड येथे शासनाकडून कातकरी समाजाला उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या आहेत.  नवीन अविभाज्य शर्त असा ठळक शिक्का ७/१२ वर उमटवून आदिवासींना शासनातर्फे या जमिनी देण्यात आल्या आहेत. उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या या जमिनींची विक्री करता येत नाही. त्यामुळे कातकरी समाजातील जमीन मालकांशी साठेकरार करून कुळमुखत्यार (पॉवर ऑफ पॅटर्नी) द्वारे जमिनी घेतल्या जात आहेत. त्यानंतर  त्यावर  अनधिकृत बांधकामे करून त्याची विक्री करण्याचा धंदा पालघर, डहाणू तालुक्यात सुरू आहे. काही संघटनांचे प्रतिनिधी जमिनी विक्रीस सहकार्य करत आहेत.  मात्र महसूल खाते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे, या प्रकारामुळे कातकरी समाज भूमिहीन होण्याची भीती   कातकरी समाजातून व्यक्त केली जात आहे.  महामार्गावर डहाणू, पालघर तालुक्यात कातकरी समाजाच्या  जागा वसई, नालासोपारा येथील दलालाकडून  पैशाचे आमिष दाखवून जागा खरेदी केल्या जात आहेत. त्यास कातकरी संघटना विरोध करीत आहे. संपूर्ण माहिती घेऊन त्याविरुद्ध लवकरच आवाज उठवण्यात येईल, असा इशारा कातकरी संघटनेचे रमेश सवरा यांनी दिला आहे.   दरम्यान, काही राजकीय मंडळीच अशा बेकायदा कामांमध्ये पुढाकार घेत आहेत. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अडथळे येत आहेत, असे एका महसूल कर्मचाऱ्याने सांगितले.

वसई-विरार, नालासोपारा येथून जमीन दलालांनी मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत कातकरी समाजाच्या जमिनी खरेदी करून व्यापारी वापर सुरू केला आहे. त्याची संपूर्ण चौकशी करावी.

शांताराम ठेमाका, अध्यक्ष, कातकरी संघटना

महामार्गालगत कातकरी समाजला शासनाने दिलेल्या जमिनींवर जर बेकायदा मार्गाने खरेदी -विक्री व्यवहार होत असतील तर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल.

संदीप म्हात्रे , मंडळ अधिकारी,  मनोर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encroachment tribal lands construction ysh
First published on: 07-12-2021 at 01:55 IST