लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर येथे येणार आहेत. त्यांच्या दौऱ्या दरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस जड- अवजड मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

शुक्रवारी पालघर येथे वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्री दाखल होणार आहेत. त्यांच्या दौरा सुरू असताना वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालय व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. विशेषतः मुंबई गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जड – अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत.

आणखी वाचा- द्राक्षांव्यतिरिक्त अन्य फळांचे वाइन उद्योग मरणपंथाला

गुजरात बाजुकडून मुंबई बाजुकडे व मुंबई बाजुकडून गुजरातकडे या दोन्ही मार्गावरून  गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत जड- अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिवनावश्यक वाहने, पोलीस वाहने,रुग्णवाहिका, अग्निशमन दल वाहने, सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने येणारी वाहने, प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना प्रवेश सुरू राहणार आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांनी दिल्या आहेत.