आरोग्य संस्थांच्या तपासणीत अनेक त्रुटी

राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयांना आगी लागल्याच्या घटना घडत आहेत.

पालघर जिल्ह्य़ातील संस्थांना ‘ना हरकत’ दाखला देण्यास शासन संस्थेचा नकार

पालघर : राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयांना आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. पालघर जिल्ह्य़ात अशा घटना घडू नये यासाठी येथील आरोग्य संस्थांचे अग्नी सुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) तसेच इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने त्या पूर्ण केल्याशिवाय रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेने ना हरकत दाखल देण्यास नकार दिला आहे.

जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या अग्नी व संरचनात्मक परीक्षणाबाबतच्या आढावा  बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या मार्गदर्शनाखाली  बैठक घेण्यात आली. त्यावेळी  विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.    यावेळी पालघर जिल्ह्यात शासनाच्या नोंदणीकृत त्रयस्थ संस्थेकडून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व आरोग्य संस्थांचे परीक्षण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.  त्यावेळी जिल्ह्य़ातील हे परीक्षण झाले असले तरी परीक्षण केलेल्या संस्थेमार्फत ना हरकत दाखला अजूनही मिळालेला नाही अशी माहिती देण्यात आली.  आरोग्य संस्थेच्या तापसणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने हा दाखला मिळाला नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.  त्यावेळी आरोग्य संस्थांनी तातडीने त्रुटींची पूर्तता करून ना हरकत दाखला घ्यावा, अशा सूचना वाढण यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

पालघर जिल्ह्य़ात शासनाची ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १३ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आहेत.  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत येत असलेल्या तेरा रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा परीक्षण झाले असल्यास त्याचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

अग्निप्रतिबंधक उपाययोजना व सुविधा उभारण्यासाठी विविध कामांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये  दक्षता घेणे व उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगून या प्रस्तावाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना अध्यक्षांनी साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना  केल्या. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यांनी शासनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधून आरोग्यविषयक सुविधा व अग्निरोधक यंत्रणा यासाठीचा प्रस्ताव परिपूर्ण सादर केल्यास निधी लवकरच उपलब्ध होण्यात अडचण निर्माण होणार नाही, असे सांगितले.

आरोग्य विभागामार्फतही परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजनाकडे पाठवले जातील असे या बैठकीत एक मताने सांगण्यात आले. आढावा बैठकीत आढावा घेतल्यानंतर शेवटी अध्यक्ष यांनी रुग्णालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून आरोग्य संस्थांची सुरक्षा राखणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.

डहाणू व जव्हार कुटीर  आरोग्यविषयक विशेष व्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम ठाणे येथे त्यासाठी प्रस्ताव पाठवला असला तरी त्यास मंजुरी मिळालेली नाही. जव्हार कुटीर रुग्णालयाच्या अग्नी सुरक्षेसाठी एक कोटी २१ लाखांचा प्रस्तावही ठाणे येथे पाठविण्यात आलेला आहे. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी व या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी अध्यक्षा यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी आरोग्य विभागाने केली आहे.  जिल्ह्यतील सर्व खासगी रुग्णालयांनी संरचनात्मक, विद्युत व अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले असल्यास त्याचा अहवाल मिळवावा. ज्यांनी तिन्ही प्रकारचे लेखा परीक्षण केले नसेल त्यांना पत्र पाठवून ते करण्यास सांगण्यात यावे, असे बैठकीत ठरले.

तपासणीत आढळलेल्या त्रुटी

आरोग्य संस्थांच्या तपासणीत अनेक त्रुटी यावेळी आढळून आल्या. त्यात रुग्णालयांमध्ये विद्युत संरचनेमध्ये सुरक्षा प्रणाली संरचना व्यवस्थित नसणे, विद्युत तारा उघडय़ावर असणे पाहण्यास मिळाले.  प्राणवायू वाहिनी सुरक्षित नसल्याचेही यावेळी आढळून आले. डहाणू व जव्हार कुटीर  आरोग्यविषयक विशेष व्यवस्था नसल्याचेही या तपासणीत निदर्शनात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Errors inspection health institutions ysh

ताज्या बातम्या