कासा : जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाची चाहुल लागताच सोमवारपासून शेतकरीवर्गाने बियाणे आणि खत खरेदीकरिता शहरातील खत विक्रेत्यांकडे खते व बियाणे खरेदीकरिता गर्दी केली होती. तलासरी तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. हजारो हेक्टरमध्ये येथे भात, ज्वारी, बाजरी, नागली, खुरासनी वगैरे पिके येथील शेतकरी घेतात. या पिकांकरिता येथील जमीन उपयुक्त ठरते. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी येथे खत खरेदीकरिता मोठी झुंबड उडताना दिसत आहे.

भात आणि बियाणांचे विविध प्रकार

 तलासरी तालुक्यातील शेतकरी भात बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात हे बियाणे,  हळवा भात म्हणून खरेदी करतात. तर मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम, हे बियाणे गरवा, निमगरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक ९० ते ११० दिवसांत पिकतो आणि गरवा भाताला १२० ते १२५ दिवसांत पिकतो. त्यामुळे हळवा भात बियाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ९० ते १८० रुपयांपर्यंत, तर गरवा भात बियाणे २५ किलो पोती १०० ते २०५ रुपये या दराने बाजारात उपलब्ध आहे.

याचबरोबर प्रामुख्याने या भागात उडीद पीक मोठय़ा प्रमाणात येथील शेतकरी घेतात. या भागात आदिवासी बांधव हे आपल्या कुटूंबांना वर्षभर पुरेल इतकी पेरणी करून थोडेफार पीक विक्रीकरिता बाजारात आणतात. या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आपापल्या ऐपतीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार पेरणी करून पीक घेतात.

प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकारचे खत व औषध शेतकऱ्यांना लागत असते. पावसाळा जवळ आला की, खतांची खरेदी सुरू होते. परंतु पावसाळय़ापुर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाववाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे. यंदाचा पाऊस १८ जूनपासुन सुरू झाला, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. वातावरणाचा अंदाज पाहता नियमित पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पाऊस चांगला पडला तरच आमच्या शेतात चांगले पीक निघेल आणि वर्षभर आम्ही आमच्या कुटूंबाचे पालनपोषण करू शकू, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.