पालघर: वडिलांनीच आपल्या सख्ख्या दोन मुलींवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना बोईसर येथे उघडकीस आली आहे. बोईसरलगतच्या एका गावात राहणारा हा ४५ वर्षीय नराधम २०१९ पासून आपल्याच मुलींवर अत्याचार करत होता. या घटनेतील एका मुलीचे वय सहा तर दुसरीचे वय १२ वर्षे आहे.
आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर या नराधम बापाने आपल्याच मुलींवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. २०१९पासून सुरू असलेल्या या अत्याचाराविरुद्ध मुलींनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु नराधमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघी घाबरून गेल्या होत्या. त्यांची मोठी बहीण लग्न करून सासरी गेली होती, तिलाही हा प्रकार समजला नव्हता. शेवटी वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून या दोन्ही पीडित मुलींनी धाडस करत शेजारच्या एका महिलेला याची माहिती दिली. ही महिला एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करते. संस्थेने तातडीने याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचित केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीच्या कडक कारवाईचे आदेश दिले. बोईसर पोलिसांनी त्या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेतील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवून त्यांच्या नराधम बापाविरुद्ध, बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायदाह्ण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.