जिल्हा परिषदेचा उपक्रम, दिवाळीनंतर कामाला सुरुवात

पालघर : पालघर जिल्ह्यातील कुंपण नसलेल्या ६४७ जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी पाचशे शाळांना २०२२ मार्चअखेरपर्यंत सिमेंट काँक्रीटच्या कुंपणाने संरक्षित करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने आखला आहे. या मोहिमेला दिवाळीनंतर आरंभ होणार असून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या सहाय्यतेने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात असलेल्या २१४२ जिल्हा परिषद शाळांपैकी ६४७ शाळांना कुंपण नसल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी पाचशे शाळांना वेगवेगळ्या योजनांच्या एकत्रीकरण करून कुंपण घालण्याची योजना जिल्हा परिषदेने आखली आहे. कुंपण घालण्याच्या प्रकल्पासाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीच्या घटकाचा निधी पुरवल्या जाणार आहे. कुशल कामगारांसाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा नियोजन विभागाकडे असलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. आरसीसी खांब व विटकामाचे सहा फूट उंचीची भिंत उभारताना लागणारा कच्चा माल ग्रामपंचायत किंवा जिल्हा नियोजन निधीमधून उभारला जाणार आहे. मोहिमेच्या स्वरूपात हे काम हाती घेण्यात येणार आहे. शाळांचे कुंपणाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या या मोहिमेमध्ये अंतर्भूत करण्यात येणाऱ्या शाळांच्या भिंतीची लांबीचे मोजमाप घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दिवाळीनंतर लगेचच जिल्हा परिषद शाळा मधील कुंपणाच्या कामाला सुरुवात होईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सलिमठ यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.