करोनाचे सावट; गतवर्षी बनविलेल्या ६ ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती शिल्लक

वाडा : गणपती मूर्ती बनविणारे व्यावसायिक करोनाच्या संकटातून अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत. गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी व तिची सजावट करण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झालेली असतानाच २० टक्के अधिक नफा मिळवून देणाऱ्या ५ ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती बनविण्यासाठी शासनाने बंदी घातल्याने या २० टक्के अधिकच्या नफ्याला मूर्तिकारांना मुकावे लागले आहे. गतवर्षांपासून करोना या संसर्गजन्य आजाराचा परिणाम सर्वच व्यावसायिकांवर झाला आहे.

वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यांतील अनेक ठिकाणी गणपतीची मूर्ती बनविणारे लहान-मोठे व्यावसायिक आहेत. या गणपती व्यावसायिकांच्या कारखान्यात गतवर्षी बनविलेले ६ ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती तशाच शिल्लक राहिलेल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने चार फुटांवरील मूर्तीना बंदी आणली आहे. यामुळे या वर्षीही या मूर्ती कारखान्यातच शिल्लक राहिलेल्या आहेत.

मोठय़ा मूर्तीना घडविण्यासाठी, तिची सजावट करण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. मात्र उंची मोठी असल्याने किंमत लहान मूर्तीपेक्षा दुप्पट मिळत असते. कमी श्रमाने, कमी वेळात अधिक पैसे मिळवून देणाऱ्या सहा ते आठ फूट उंचीच्या मूर्तीना शासनाने बंदी घातल्याने मूर्तिकारांना मोठा अर्थिक फटका बसला आहे.

२० टक्के किमती वाढल्या

कच्च्या मालाच्या २० टक्के किमती वाढल्या आहेत, शाडू माती, रंग, सजावटीस लागणाऱ्या वस्तू, कारागिरांची मजुरी, कच्चा माल वाहतुकीस येणारा खर्च अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचे दर २० टक्क्यांनी वाढल्याने मूर्तीच्या किमती वाढलेल्या दिसून येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीची कधीही घोषणा होते. या टाळेबंदीमुळे गतवर्षांपासून ५० टक्के ग्राहकांनी गणपतीची स्थापना करणे बंद केले आहे. याचाही मोठा फटका आम्हा मूर्तिकारांना बसला आहे.

 – कैलास रसाळकर, मूर्तिकार, वाडा