बोईसर: बोईसर शहराच्या मुख्य रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी फटाक्यांच्या विक्रीची दुकाने दिसत आहेत. मात्र या दुकानांनी अग्निशमन विभाग, पोलीस, ग्रामपंचायत कोणाचीच परवानगी घेतलेली नाही. फटाके विक्रीसाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीची परवानगीही आवश्यक असते, मात्र अजूनही अनेक ठिकाणी संबंधित विभागाच्या कार्यालयात अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे या दुकानांनाही ही परवानगी मिळालेली नाही. अनेकदा या दुकानांविषयी वाद निर्माण झाल्यावर ती प्रकरणे मिटवण्यासाठी राजकीय नेते हजेरी लावतात. त्यामुळे त्या दुकानांना अभय मिळते आणि बेकायदा दुकानांची संख्या वाढत जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईसर शहरातील झोपडपट्टी भागात किराणा दुकानातूनही फटाक्यांची विक्री केली जाते. बोईसर बाजारपेठेत तर कापडदुकानांपासून सगळीकडे फटाक्यांची विक्री राजरोस सुरू असते. फटाके विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्र, विक्रेत्याचा सज्ञान असल्याचा पुरावा, संबंधित जागेची माहिती, अर्जाच्या चौकशी ठरलेले चलन भरलेला परवाना आदीपैकी कोणत्याच गोष्टींची पूर्तता केली जात नाही. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून ही दुकाने चालतात. मागील वर्षी वाडा येथे फटाका बाजाराला आग लागली होती. त्यावेळी हे सगळे मुद्दे चर्चेत आले होते. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही. आता यंदाची दिवाळी आली तरी पुन्हा कागदपत्र आणि परवान्यांची स्थिती जैसे थेच आहे. मग एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecracker shops main road fire brigade department allowed compulsory ysh
First published on: 19-10-2022 at 00:02 IST