कासा : इभाडपाडा येथील कामेश्वर हॉटेल येथील धुलाई केंद्रामध्ये धुतलेल्या गाडय़ाचे रसायनमिश्रित पाणी ओढय़ात वाहून जात असल्याने ओढय़ातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे मासे व इतर जीवजंतू नष्ट होत चालले असून नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तलासरी इभाडपाडा येथून मुंबई- अहमदाबाद महामार्गाखालून वाहणाऱ्या ओढय़ात कामेश्वर हॉटेल येथील धुलाई केंद्रामध्ये रसायन वाहून नेणाऱ्या टँकरची साफसफाई केली जाते. त्यामुळे विषारी रसायनमिश्रित पाणी ओढय़ात वाहून जात असल्याने ओढय़ातील मासे, खेकडे, बेडकासह जीवजंतू मृत पावत असल्याचे प्रकार घडत आहे. पाणी दूषित होऊन लालसर झाले असून परिसरात दुर्गंधी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

 या ओढय़ात काही दिवसांपूर्वी विषारी रसायनमिश्रित पाणी टाकण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा हे पाणी त्या ओढय़ात गेल्याने इभाडपाडा, मंडळपाडा, कवाडापर्यंत ओढय़ातील मासे, बेडूक असे जलचर प्राणी मृत्यू पावले आहेत. यातील काही विषारी मासे परिसरातील आदिवासींनी खाल्ल्याने त्यांना चक्कर, पोटदुखीच्या त्रासाला सामारे जावे लागले.

तलासरी इभाडपाडा ते कवाडा येथून पुढे जाऊन वसा-सवणे नदीला मिळतो. या परिसरातील ओढय़ाचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी संपूर्ण ओढय़ाची पाहणी करत इभाडपाडा येथील कामेश्वर हॉटेलमधील धुलाई केंद्रामध्ये विषारी रसायन वाहून नेणारे टँकर धुतले जात असल्याने ते पाणी ओढय़ात जाऊन मासे मृत झाले असून पाणीही दूषित  झाल्याचे हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र हॉटेल मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे प्रकरण नगरपंचायतकडे गेले आहे. सदर घटनेबाबत नगरपंचायत त्या हॉटेल मालकाला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे. विषारी रसायनमिश्रित पाणी ओढय़ाला कोठून येते याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इभाडपाडा येथून वाहणाऱ्या ओढय़ाला दोन वेळा विषारी पाणी वाहून आल्याने मासे, खेकडे, बेडूक मृत पावले आहेत. कामेश्वर हॉटेलमध्ये केमिकलचे टँकर धुऊन ते पाणी ओढय़ात सोडले जात आहे. 

अमित आडगाग्रामस्थ

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish and animals dead due to chemically mixed water zws
First published on: 30-09-2022 at 01:44 IST