scorecardresearch

राष्ट्रीय महामार्गावरील दाट धुक्यामुळे दोन ठिकाणी अपघात; वाहतूक चार तास विस्कळीत

पालघर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसांपासून थंडी आणि दाट धुक्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील दाट धुक्यामुळे दोन ठिकाणी अपघात; वाहतूक चार तास विस्कळीत
प्रातिनिधिक छायाचित्र

कासा :  पालघर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसांपासून थंडी आणि दाट धुक्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून बुधवारी २८ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे महामार्गावर दोन अपघात होऊन वाहतूक जवळपास चार तास विस्कळीत झाली होती.

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर मेंढवन खिंडीत टँकरचालकाला धुक्यामुळे वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे बेंझीन हे रसायन घेऊन जात असलेला टँकर महामार्गावर उलटला. महामार्गावर टँकर उलटल्यानंतर जवळपास चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बेंझीन हे रसायन घातक व ज्वलनशील असल्या कारणाने पोलिसांनी खबरदारी म्हणून महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. टँकर उलटल्यानंतर टँकरमधील वाहनचालक व इतर दोन व्यक्ती किरकोळ जखमी अवस्थेत टँकरमधून सुरक्षित बाहेर पडले. त्यानंतर टँकरने पेट घेतला. या आगीमध्ये रसायन घेऊन जाणारा टँकर भस्मसात झाला.

जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डहाणू तसेच तारापूर येथून अग्निशमन यंत्रणांना तीन ते साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. अपघातग्रस्त टँकर बाजूला केल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली.

चारोटीत टेम्पोची कंटेनरला धडक 

महामार्गावर पसरलेल्या धुक्यामुळे चारोटी टोल नाक्याजवळ मुंबईकडून गुजरातकडे जात असलेला टेम्पोने समोर उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागच्या बाजूने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये  टेम्पोचालक जखमी झाला, त्यामुळे चालकाला कासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तसेच टेम्पोचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या