निखिल मेस्त्री
तारपावर धरलेला ताल, त्यावर थिरकणारा कातकरी समाज आणि त्यांची एकापेक्षा एक धाडसी व नेत्रदीपक नृत्ये, लोकपरंपरा यांचे दर्शन पालघरवासीयांना झाले, कातकरी महोत्सवातून. डहाणूच्या आदिवासी विकास विभागाने हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवामध्ये एकूण ३२ स्टॉल होते आणि दोन हजारांवर कातकरी बंधू-भगिनींनी त्यास प्रतिसाद दिला.
कातकरी समाजातील लोककला, परंपरा, चालीरीती जगाला याव्यात तसेच या समाजाने प्रगत प्रवाहात सामील व्हावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने आयोजित केलेला हा दुसरा महोत्सव आहे. पालघरवासीयांसह जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यास चांगला प्रतिसाद लाभला.
शैक्षणिक सबलीकरणासह, स्वयंरोजगाराची जाणीव कातकरी समाजाला व्हावी, यासाठी महोत्सवात प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी महोत्सवात वेगळी दालनेही होती. अनेकांनी तेथे रस दाखवून या योजनांची माहिती घेतली. आपली नोंदणीही केली. कातकरी समाजातील प्रौढ, बालके आणि वृद्धांसाठीही आरोग्यविषयक तपासण्या, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी आयोजित केली होती. त्या वेळीच मोफत मार्गदर्शन, शस्त्रक्रिया, औषधे, चष्मे वाटप केले गेले. त्याचबरोबर या समाजाचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी त्यांना मानसिक समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन, औषधोपचार आदींची माहितीही देण्यात आली.
सरकारी योजनांमध्ये सवलत घ्यायची म्हटल्यावर आधी मागितली जातात ती कागदपत्रे. तहसीलदार कार्यालयामार्फत विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. कातकरी समाजातील काही नागरिकांची योजनांच्या लाभासाठी नोंदणी करण्यात आली. महोत्सवाला कातकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याने प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी रोटरी क्लबच्या स्टॉलमधून मासिक पाळी व्यवस्थापन व वैयक्तिक स्वच्छता याबाबतचे महत्त्व सांगितले गेले. दोनशेहून अधिक महिलांनी या दालनाला आवर्जून भेट दिली. या वेळी महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरणही करण्यात आले.
महोत्सवामध्ये कातकरीसह आदिवासींसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच या समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक शैक्षणिक योजना याची सविस्तर माहिती दिली गेली. जे या योजनांसाठी पात्र आहेत, त्यांच्या नोंदणीलाही सुरुवात झाली. जातीचा दाखला, शिधापत्रिका, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांबद्दल माहिती देऊन ती कशी मिळवावी, याबद्दल मार्गदर्शन केले गेले. आधार कार्ड नोंदणी, महा आवास अभियानाविषयी माहिती, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदर्शन व विक्री केंद्र तेथे उपलब्ध होते.
त्याचबरोबर कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्यामार्फत कृषीपूरक माहिती दिली गेली. अनेक शेतकरी महिला-पुरुषांनी या स्टॉलला चांगला प्रतिसाद दिला. कातकरी समाजातील पाहिले पीएचडीधारक सुभाष शेलार यांनी विविध पुस्तके-साहित्य दालनात ठेवली.
या महोत्सवाच्या प्रदर्शन व विक्री दालनामध्ये गांडूळ खत आकर्षण ठरले. तसेच मोह फुलापासून बनवलेल्या विविध पाककृती नव्याने पाहावयास मिळाल्या. गृहलक्ष्मी उद्योग संघाने येथे विक्रीसाठी ठेवलेल्या मोह लाडू, मोह मनुके यांना चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांनी सेंद्रिय पद्धतीचे उगवलेले व हातसडीच्या उडीद, तूर अशी डाळी तर कुळीथ पीठ, नाचणी पीठ, नाचणी लाडू, नाचणी पापड, नाचणी सत्त्व, नाचणी बिस्कीट, मोहरी यांनाही चांगली मागणी होती. मोहिनी उद्योग संघाच्यामार्फत आणल्या गेलेल्या जावईची गुंडी या नावाच्या हातसडीच्या तांदळाने शहरवासीयांना भुरळ पाडली. तर वारली चित्रकारांनी साकारलेल्या वारली पेंटिंग, वारली चित्रशैली रेखाटलेल्या विविध कलाकुसर, कलाकृती आदी वस्तूंनाही चांगली मागणी होती. लिची फळ, चिकू, केळी, सफेद व लाल रसाळ जांभूळ, पपई आदी फळे, कोनफळ आदींसारखे रानकंदही अनेक महिला बचत गटांच्या स्टॉलवर उपलब्ध होते.
या महोत्सवात प्रथमच आयुर्वेदिक आणि वनौषधींची विक्री झाली. यामध्ये वेखंड, मुलतानी, निर्गुडी, निम पान पावडर, कोरफल, बाळ हरडा, नागरमोथा, तुळशीपत्र आदींचा समावेश होता. तसेच डहाणूच्या सुप्रसिद्ध चिकूपासून बनलेले लोणचे, चिकुवडी व चिप्सही महिला बचत गटांनी विक्रीस ठेवल्या होत्या.
महोत्सवात पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावीत, पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, विविध शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच आदिम कातकरी जिल्हा व राज्यस्तरीय संघटनेचे मान्यवर यांनी भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Folklore philosophy tribal development dahanu department respect katkari tradition amy
First published on: 21-05-2022 at 00:03 IST