पालघर : पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊसाच्या फडामध्ये बिबट्याने कायमस्वरूपी निवास करण्याचे ठिकाणे बनविली आहेत त्या धर्तीवर पालघर जिल्ह्यात चिकू किंवा इतर वाड्यांमध्ये बिबट्याला कायमस्वरूपी निवास करण्याची व्यवस्था होऊ नये या दृष्टीने वनविभागाने आखणी केली आहे. याखेरीज बोर्डी, सफाळे व बोईसर च्या पूर्व पट्ट्यांमध्ये वन विभागाने बिबट्यासाठी पिंजरे बसविले आहेत.
पालघर व डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून दिसून आला असून अलीकडच्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत बिबट्याने बकऱ्या, वासरं व कुत्र्यांना आपले भक्ष बनवल्याचे दिसून आले आहे. सफाळा व बोर्डी परिसरात मानवी वस्ती मध्ये बिबट्याचा शिरकाव झाल्याचे नागरिकांच्या घरगुती सीसीटीव्ही तसेच वन विभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आढळून आले आहे.
बिबट्याच्या वावरामुळे रात्री कामावरून परतताना अथवा सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तसेच शालेय विद्यार्थी व शेतीवाडी मध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ही बाब उपस्थित केल्यानंतर बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरे बसविण्याच्या सूचना त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सद्यस्थितीत बोर्डी येथे वासरू मारलेल्या ठिकाणी बिबट्यासाठी पिंजरा बसवण्यात आला असून सफाळे पश्चिम भागात व बोईसरच्या पूर्व भागात बिबट्याच्या वावराच्या संभाव्य ठिकाणी असे पिंजरे बसवण्यात आले आहेत. काही पशूला बिबट्याने आपले भक्ष केले असले तरीही अजूनपर्यंत बिबट्याने नागरी वस्तीमध्ये हल्ला केला नसल्याची बाब समाधानाची असल्याचे डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजय दिवाकर यांनी सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे रचली असले तरीही या पिंजऱ्यांमध्ये बिबट्याला आकर्षित करण्यासाठी भक्ष ठेवला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
ऊसातील बिबट्याप्रमाणे वाडीतील बिबट्या पद्धती पालघर जिल्ह्यात रुजू होऊ नये अर्थात बिबट्याने चिकू किंवा अन्य घनदाट वाड्यांमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करू नये यासाठी वन विभागाने योजना केली आहे. त्याच्या आधारे बिबट्याचा संभाव्य वावर असणाऱ्या ठिकाणी फटाके फोडण्यात येत असून बिबट्याला सहजगत नागरी वस्ती व लगतच्या भागातून जंगलामध्ये परतवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
शीघ्र बचाव पथकांची संख्या वाढवणार
सध्या पालघर जिल्ह्यात एक वन विभागाचे एक शिघ्र बचाव पथक असून त्यामध्ये पिंजरे, गुंगी देणारे ट्रँग्यूलायझर डार्ट इंजेक्शन, जाळ्या व प्रशिक्षित कर्मचारी यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे ७० टक्के गावांच्या लगत वनक्षेत्र असून वसई पासून गुजरात सीमेपर्यंत उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी या पथकाच्या मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत दोन नवीन अतिरिक्त वन विभागाची बचाव पथक निर्माण करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून त्यासाठी ६४ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला वरिष्ठ कार्यालयाकडून तत्वतः मान्यता देण्यात आली असून त्याची पूर्तता लवकरच करण्यात येईल असेही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
थर्मल ड्रोन द्वारे देखरेख
डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी घनदाट वाडी व वनक्षेत्र असून त्यामध्ये लपून बसलेल्या बिबट्याचा शोध घेणे व त्यावर देखरेख ठेवणे कठीण होत असते. याकरिता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सामाजिक दायित्व फंडातून सुमारे सात लाख रुपये खर्च करून थर्मल ड्रोन वन विभागाला मिळणार असून इतर सेवाभावी संस्थांनी देखील अशा प्रकारचे साहित्य व उपकरण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
वन्यजीव निवारण योजना
पालघर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प सुरू असून त्यामुळे बिबट्या व अन्य वन्य जीव यांच्या पारंपारिक अधिवास क्षेत्रामध्ये उत्खनन व त्यासाठी स्फोट घडवले जात आहेत. तसेच या प्रकल्पांसाठी वृक्षतोड केली जात असून त्यामुळे वन्यजीव नागरी वस्तीमध्ये येत असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वन्यजीव निवारण योजना अर्थात वाईल्ड लाईफ मीटिंगेशन प्लॅन तयार केला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वनविभाग प्रयत्न करणार असल्याची माहिती डहाणू येथील उपवनसंरक्षक निरंजय दिवाकर यांनी दिली आहे.

