Forest Department water policy opposition forest administration the work dam ysh 95 | Loksatta

वनखात्याचे पाणी ‘अडवा’ धोरण; वन प्रशासनाने विरोध केल्याने डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून ठप्प

कोरडवाहू शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाडा तालुक्यातील डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद पडले आहे.

वनखात्याचे पाणी ‘अडवा’ धोरण; वन प्रशासनाने विरोध केल्याने डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून ठप्प
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

वाडा : कोरडवाहू शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाडा तालुक्यातील डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद पडले आहे. त्यामुळे परिसरातील सहा गावांतील शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. या सिंचन प्रकल्पात साठा होणारे पाणी लांब अंतरावर नेण्यासाठी कालव्यांसाठीही जमीन संपादित करून कालवा खोदाईचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यानंतर काही काळाने या प्रकल्पाला वनखात्याने विरोध केल्याने काम थांबविण्यात आले. त्यानंतर आजतागायत या बंधाऱ्याचे काम ठप्पच आहे.

या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या वनजमिनीसाठी सुधारित अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. या जमिनीची रक्कम  वनखात्याकडे वर्ग करावी लागणार असल्याची माहिती लघुसिंचन उपविभाग सूर्यानगर यांच्याकडून देण्यात आली आहे. शेतकरी या प्रकल्पाच्या पूर्ततेची वाट पाहात आहेत. या प्रकल्पाचे अर्धवट काम  सुरू करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु आजतागायत कुणी दखल घेतली नाही, असे येथील स्थानिक शेतकरी जगदीश कोकाटे यांनी सांगितले.

डाहे आजवर..

९७९ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

४ वर्षांत

प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीचे काम ३७ टक्के पूर्ण

२१ लाख ७७ हजार

आजवर प्रकल्पावर खर्च

  • १२४ हेक्टर जमीन या प्रकल्पात सिंचनाखाली
  • ७ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मुद्दा
  • १९७७ मध्ये लघुसिंचन उपविभाग सूर्यानगर विभागाकडून प्रकल्पास मंजुरी

राज्यपालांना निवेदन

डाहे प्रकल्पाचे अर्धवट राहिलेले काम तातडीने हाती घेऊन या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन डाहे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन गेल्या आठवडय़ात वाडा येथे कातकरी समाजाच्या मेळाव्यासाठी आलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना व या समारंभाला उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. 

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 00:02 IST
Next Story
आरोग्य कर्मचारी भरती लवकरच