पालघर : ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष आणि उद्यम जगतातील उमदे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल  हे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज मोटारीने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव मोटारीची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. त्यांनी आसनपट्टी बांधली नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येते. पुढच्या आसनावरील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वापीला हलवण्यात आले.

मितभाषी असलेल्या मिस्त्री यांच्याकडे २०१२मध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्षपद आले. त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. नावात ‘टाटा’ नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले. त्यांना रतन टाटा यांचे वारस म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, केवळ चार वर्षांच्या कालावधीत मिस्त्री यांना टाटा समूहातून पायउतार व्हावे लागले. पुढे सन्मानासाठी त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला. त्यात त्यांना अपयश आले. त्याआधी ते कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात म्हणजे शापूरजी पालनजी अँड कंपनीत १९९१ मध्येच, म्हणजे वयाच्या २३व्या वर्षी संचालक बनले. तीन वर्षांनी ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाटय़ाने यशाचे शिखर गाठले.

मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळे एक नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला असून उद्योग जगताची अपरिमित अशी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

अपघातांचा तपशील देण्यास टाळाटाळ

मनोर- आच्छाड पट्टयातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांची नोंद मनोर, कासा आणि तलासरी पोलीस ठाण्यात केली जाते. मात्र अपघातस्थळांचे ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये रूपांतर होऊ नये म्हणून तक्रार नोंदविताना देखभाल करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी अपघातस्थळ पुढे-मागे दाखवतात. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून अपघातांचा तपशील दडवला जात असल्याचे सांगण्यात येते.

टोल का भरावा?

या महामार्गाची देखभाल-दुरुस्तीचे आणि टोल वसुलीचे काम कल्याणी कंपनीकडे आहे. परंतु, अपघातानंतर आग लागल्यास ती विझवण्यासाठी कंपनीकडे स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नाही. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी पुरेशा क्षमतेची क्रेनव्यवस्था नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांचा अभाव आहे. परिणामी, जखमी दगावतात. या मार्गावर प्रवास करताना टोल का भरावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुर्घटना कशी घडली?

मुंबई-अहमदाबाद या सहापदरी महामार्गाचा अजूनही काही भाग चौपदरीच आहे. अपघाताच्या ठिकाणी तीनपदरी रस्ता निमुळता होत पुलावर दुपदरी होतो. परंतु याबाबतचा सूचना फलक लावला नसल्याने चालकाला चकवा देणाऱ्या या रस्त्याचा अंदाज येत नाही. मिस्त्री यांच्या चालकालाही या चकव्याचा अंदाज न आल्याने मोटार पुलाच्या कठडय़ावर आदळली, असे सांगण्यात आले.

संरक्षक उपायांकडे दुर्लक्ष

रस्ता तयार करताना कोणत्या संरक्षक उपाययोजना कराव्यात याबाबत इंडियन रोड काँग्रेसच्या स्पष्ट सूचना आहेत. पुलाच्या लोखंडी किंवा काँक्रीट कठडय़ाआधी संरक्षक अडथळा (बॅरियर) बसवणे आवश्यक असते. त्यामुळे मोटारीचा वेग कमी होऊन प्रवाशांचे प्राण वाचू शकतात. परंतु, मोटारीच्या धडकेची तीव्रता कमी करणारा अभियांत्रिकी उपाय केला नसल्याने या अपघाताची तीव्रता वाढली आणि मिस्त्री यांच्यासह दोघांना प्राण गमवावा लागला.

चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. त्यांनी पोलीस महासंचालक आणि पालघरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली आणि त्यानंतर चौकशीचे आदेश दिले.

दीड वर्षांत १०६ बळी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते अच्छाड या ५२ किलोमीटरच्या रस्त्यावर १८ महिन्यांत ९६ पेक्षा अधिक अपघात झाले असून त्यांत १०६ नागरिकांना प्राण गमवावे लागले, तर ४९ प्रवासी कायमचे अपंग झाले. या महामार्गावर मेंढवण घाट, सोमटा, चारोटी उड्डाणपूल, आंबोली येथे तीव्र वळणे आहेत. ही ठिकाणे मृत्युचे सापळे आहेत.

सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला. भारताच्या आर्थिक धैर्यावर विश्वास असलेले ते एक आश्वासक उद्योजक होते. त्यांच्या निधनामुळे उद्योग आणि व्यापार जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति सहवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former tata sons chairman cyrus mistry dies in road accident near palghar
First published on: 05-09-2022 at 04:51 IST