प्लास्टिकचे नव्हे ‘फोर्टीफाइड’ तांदूळ

जिल्हा पोषण अभियानाच्या तांदळाबाबत पालकांमध्ये संभ्रम; शिक्षण विभागाची जनजागृती तोकडी

‘फोर्टीफाइड’ हा तांदूळ सामान्य तांदळाच्या रंगापेक्षा पिवळसर रंगाचा आहे. तसेच वजनाने हलका असल्याने तो प्लास्टिकसदृश दिसत आहे. पाण्यात टाकताच तांदळाचे दाणे पाण्यावर तरंगत आहेत.

जिल्हा पोषण अभियानाच्या तांदळाबाबत पालकांमध्ये संभ्रम; शिक्षण विभागाची जनजागृती तोकडी

पालघर : पालघर जिल्ह्य़ामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या पोषण अभियान अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारा तांदूळ प्लास्टिकसदृश असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. मात्र हा ‘फोर्टीफाइड’ तांदूळ पौष्टिक असल्याचे प्रमाणीकरण असल्यानंतरही त्याबाबतीत स्थानिक स्तरावर शिक्षण विभागामार्फत अजूनही जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांदळाला घेऊन अनेक उलट-सुलट चर्चा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

केंद्र शासनाच्या भारतीय अन्न महामंडळामार्फत पोषण अभियान योजनेंतर्गत पालघर व अहमदनगर जिल्ह्य़ात या वर्षांपासून प्रथमच ‘फोर्टीफाइड’ तांदूळ दिला जात आहे. हा तांदूळ वाटप झाल्यानंतर तांदळात असलेल्या पोषण मूल्यची माहिती पालकांना शाळांकडून दिली गेली नव्हती. म्हणून सुरुवातीला विक्रमगड, मोखाडा, जव्हार तर आता पालघर तालुक्यातही विविध ठिकाणी शाळांमध्ये देण्यात येणारा हा तांदूळ प्लास्टिकसदृश असल्याची बोंब उठली व पालकांमध्ये संभ्रम तयार झाला.

हा तांदूळ सामान्य तांदळाच्या रंगापेक्षा पिवळसर रंगाचा आहे. तसेच वजनाने हलका असल्याने तो प्लास्टिकसदृश दिसत आहे. पाण्यात टाकताच तांदळाचे दाणे पाण्यावर तरंगत आहेत. या सर्व प्रकारामुळे व त्याबाबतची जनजागृती नसल्याने सर्व ठिकाणी वाटप झालेला तांदूळ प्लस्टिकचाच आहे असा निष्कर्ष काढला जात आहे.

सुरुवातीला वितरित केलेला तांदूळ प्लास्टिकसदृश असल्याचे दिसून आल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत तो तांदूळ तपासासाठी अन्न खाद्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. भारतीय अन्न महामंडळामार्फत त्याचे स्पष्टीकरण पालघर जिल्ह्य़ाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या स्पष्टीकरणामध्ये हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाइड (पोषणयुक्त) तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. पालघर व अहमदनगर जिल्ह्य़ात वितरित करण्यात आलेल्या तांदळावरून मोठी संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर शालेय पोषण अभियानाच्या राज्य कार्यालयाने दोन्ही जिल्ह्य़ांच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना या पौष्टिक तांदळाच्या गुणधर्माचे स्पष्टीकरण केले आहे.

जिल्हा पोषण अभियान यांच्या कार्यालयाने स्थानिक स्तरावर शाळांना व गटशिक्षणाधिकारी यांना जनजागृती करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्याने ४ ऑगस्ट रोजी हे पत्र जिल्ह्य़ाला पाठवले आहे व पालघर जिल्ह्य़ाच्या शिक्षण विभाग कार्यालयाने ५ ऑगस्ट रोजी जिल्ह्य़ातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्याची जनजागृती करावी असे म्हटले.  तरी अजूनपर्यंत त्याबाबतची जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तांदळाबाबत अनेक गैरसमज पसरत आहेत व पालकवर्ग चिंतेत आहेत.

राज्य पोषण अभियानाने जिल्ह्य़ाला पोषकमूल्य व गुणवत्तापूर्ण तांदळाबाबत शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे म्हटले असताना त्याबाबत संभ्रम कायम आहे.

तांदळाच्या दर्जाविषयी..

* तांदळामध्ये फोर्टीफाइड तांदूळ प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम याप्रमाणे आहे.

* विद्यार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्याकरिता तांदळामध्ये लोह, व्हिटॅमिन ब १२ जीवनसत्त्व, झिंक, अ जीवनसत्त्व, बीएच, बी २, बी ५, बी ६ जीवनसत्त्व या पोषण घटकांचा ( Micronutents ) समावेश आहे.

* फोर्टीफाइड तांदळाबाबत अधिकची माहिती केंद्र शासनाच्या ‘फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्ड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तांदळाबाबत अनेक गैरसमज पालकांमध्ये पसरत आहेत असे निदर्शनास आले आहे. गट शिक्षण अधिकारी यांना जनजागृतीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्तरावर त्या दृष्टीने जागरूकतेचे काम अधिक प्रभावी करू, त्यामुळे नक्कीच गैरसमज दूर होतील असा विश्वास आहे.

सिद्धराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fortified rice to children in midday meals in palghar zws

ताज्या बातम्या