भवानगड, तांदुळवाडी, काळदुर्ग, आशेरीगडावर वन विभागाकडून फक्त काही सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडकोटांच्या पर्यटन, संवर्धन अस्तित्वासाठी ठोस व कार्यशील यंत्रणा आजही अस्तित्वात नाही. ती कार्यरत होईल तोपर्यंत अनेक स्थळे पूर्णपणे नामशेष होतील अशी भीती दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमी मंडळींकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील गडकोटांची वाढती दुरवस्था व त्यावरील इतर प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जिल्ह्यातील दुर्गमित्र करत असलेले संवर्धन कार्य गडकोटांवरील स्थळे स्वच्छता करण्यापुरती मर्यादित आहेत. गडकोटांवरील मुख्य स्थळांची डागडुजी न झाल्याने सर्वच भुईसपाट होण्याच्या प्रवासाला आहेत. तसेच भुईकोट व जलदुर्ग ऐतिहासिक स्थळे अश्लील प्री वेडिंग, दारूबाजांचे धिंगाणे, प्रेमीयुगलांचे असभ्य वर्तन, विनापरवाना छायाचित्रण, प्लास्टिक कचरा वाढ, गडावरील मंदिरे व तोफांची दुरवस्था, गडावरील व परिसरातील मूत्र्यांची चोरी व विद्रूपीकरण, गडाच्या जागेवर खासगीकरण हे प्रश्न अत्यंत वेगाने वाढत आहेत. पालघर जिल्ह्यातील लहान मोठे गडकोट पाहता त्यांची संख्या ५०हुन अधिक आहे. यातील राज्य पुरातत्त्व मुंबई, रत्नागिरी विभाग व केंद्रीय पुरातत्त्व सायन विभाग यांच्या संरक्षित स्मारकात फक्त तीन किल्ले नोंदवलेले आहेत. यात जंजिरे वसई किल्ला, जंजिरे अर्नाळा किल्ला, शिरगाव कोट अंतर्भूत आहेत. याशिवाय वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुर्गाची संख्या अधिक असली तरीही प्रत्यक्षात वनविभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारकात किंवा संवर्धनासाठी जिल्ह्यातील एकही किल्ला नाही.

पालघर वनविभागाने जिल्ह्यातील भवानगड, तांदुळवाडी, काळदुर्ग, आशेरीगड यावर कचराकुंडी, मोजक्या पायऱ्या, लोखंडी रेलिंग अशा काही सुविधा केल्या असल्या तरीही त्याने मुख्य गडाचे वा दुर्गाचे काहीही संवर्धन झालेले नाही ही परिस्थिती आहे. किल्ले वसई मोहीम परिवार संस्था अत्यंत जबाबदारीने जिल्ह्यातील शक्य तितक्या गडकोटांच्या संवर्धनासाठी गेली १९ वर्षे सातत्याने कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या विनंती पत्रकावर अजूनही कार्यवाही झाली नाही याकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

दुर्गमित्रांच्या स्वच्छता मोहिमांमध्ये जमा होणारा दारूच्या बाटल्यांचा खच व प्लास्टिक कचरा चिंताजनक आहे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना व व्यवस्था नसल्याने हौशी पर्यटक व बेभान प्रेमीयुगलांचे धिंगाणे गडकोटांच्या अस्तित्वास मारक ठरत आहेत.  जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक गडकोटांवर स्थानिक प्रशासनअंतर्गत कायमस्वरूपी तपासणी चौकी केंद्र ठेवणे शक्य नसेलही, पण किमान सातत्याने गर्दीच्या गडकोटांवर कायमस्वरूपी ठोस पोलीस यंत्रणा कार्यरत होणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये आशेरीगड (खडकोना गाव), जंजिरे वसई किल्ला (वसई गाव), जंजिरे अर्नाळा किल्ला (अर्नाळा बेट), तांदूळवाडी दुर्ग (तांदूळवाडी गाव सफाळे), शिरगाव कोट (शिरगाव गाव), काळदुर्ग किल्ला (वाघोबा खिंड) यावर अत्यंत जलदगतीने पोलीस प्रशासन, पुरातत्त्व विभाग, वनविभागअंतर्गत पर्यटक तपासणी केंद्र नेमणे आवश्यक आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forts in palghar district in worse condition zws
First published on: 29-06-2022 at 00:19 IST