डहाणू : गुजरात मधील समुद्रात मासेमारी बोटीवर काम करण्यासाठी गेलेल्या तलासरी तालुक्यातील झाई येथील चार खलाशी कामगार बोट अपघातात पाण्यात वाहून बेपत्ता झाले आहेत. मासेमारी करून परतत असताना बोटीचा अपघात होऊन यामध्ये पालघर मधील चार आणि गुजरात मधील एका खलाशी बेपत्ता झाले असून यातील काहींचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गुजरात मधील दिव नजीकच्या वनगबार बंदरातून १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मासेमारी साठी निघालेली चूनीलाल बारिया यांची “निराली” बोट पालघर मधील सहा आणि गुजरात मधील चार खलाशांसह दिवदमणच्या समुद्रात मासेमारी करून परतत असताना ४ मार्च रोजी बोटीचा अपघात झाला. अपघातात झाई येथील खलाशी अक्षय प्रभू वाघात, अमित अशोक सुमर, सूरज विलास वळवी, सूर्या अशोक शिंगडा सह गुजरात मधील दिलीप बाबू सोलंकी रा. वनगबार हे पाच खलाशी पाण्यात पडून बेपत्ता झाले आहेत. तर झाई येथील इतर दोन खलाशी अनिल रमेश वांगड आणि जलाराम गोविंद वळवी हे सुखरूप आहेत.
सध्या याप्रकरणी अधिक माहिती प्राप्त नसल्याची माहिती देण्यात येत आहे. गुजरात पोलिसांनी घोलवड पोलीस ठाण्यात माहिती दिली असून घोलवड पोलिसांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी साहेबराव कचरे यांनी दिली.