डहाणू : पोलिसांत नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक आदिवासी तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या किशोर कुडू या भामटय़ास पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
वाणगाव कंसारा पाडा येथे गेली पाच वर्षे भाडय़ाने खोली घेऊन राहणारा किशोर कुडू हा स्वत: पोलीस असल्याची बतावणी करत असे. आपल्या चारचाकीच्या पुढे पोलीस नावाची पाटी आणि पोलीस टोपी ठेवून वावरत असलेल्या या भामटय़ाने अनेक बेरोजगार तरुणांना पोलिसांत भरती करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यापोटी त्यांच्याकडून तो पैसेही घेत असते. अशा दहा ते बारा आदिवासी तरुणांना फसवत त्याने लाखो रुपये उकळले आहेत. त्याचप्रमाणे आपण पोलीस आहोत, असे सांगत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीच्या नावाखाली किराणा दुकानदारांकडूनही त्याने लाखो रुपये घेतले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरती आपल्या बनावट पोलीस सहकाऱ्यांमार्फत दमण आणि दादरा नगर हवेली येथे बनावटी दारू तस्करी करणाऱ्यांचा त्याने माग काढला होता. शिवाय त्यांच्याकडून पोलीसच असल्याच्या थाटात वसुलीही केली होती.
वाणगाव कंसारा पाडय़ात त्याने पोलीस म्हणून दहशत निर्माण केली होती. पालघर पोलिसांकडे या तोतया पोलिसाविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहेत. त्याने आजवर नक्की किती जणांना फसवले होते ते चौकशीत समोर येईल.