उपलब्ध झालेल्या लससाठय़ापेक्षा ८८ हजार नागरिकांचे अतिरिक्त लसीकरण

पालघर : लसीकरणासाठी उपलब्ध होणाऱ्या कुप्यांमधील इष्टतम व सर्वाधिक लशीची मात्रा वापरण्याचे तसेच लसीकरणादरम्यान किमान घट करण्यामध्ये पालघर जिल्हा हा राज्यात मुंबईच्या खालोखाल दुसऱ्या क्रमवारीत आहे. यामुळे उपलब्ध झालेल्या लससाठय़ापेक्षा ८८ हजार नागरिकांचे अतिरिक्त लसीकरण झाले आहे. 

एका लशीच्या कुपीमध्ये दहा लसमात्रा असल्या तरीही त्यामध्ये असलेल्या अतिरिक्त लस द्रव्यातून अनेकदा एक किंवा दोन नागरिकांचे लसीकरण अतिरिक्तरीत्या होत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कुपीमधून इंजेक्शनमध्ये लस भरताना लस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य कर्मचारी विशेष काळजी घेत असतात. त्यामुळे पालघर जिल्ह्याने आतापर्यंत ८८ हजारपेक्षा अधिक लसमात्रांचा वापर झाला आहे.

राज्यात कोव्हिशिल्ड लस वापरादरम्यान नुकसान (अपव्यव) होण्याचे प्रमाण ०.५५ इतके असताना पालघर जिल्ह्याचे लस नुकसानीचे प्रमाण ‘उणे पाच’ (-५) टक्क्यांच्या जवळपास आहे. याचा अर्थ लसमात्रा वाया जाण्याऐवजी लशीच्या कुपीमधील अतिरिक्त साठय़ाचा पुरेपूर वापर झाला आहे.

दोन लशींच्या कुपीमधून एका अतिरिक्त नागरिकाचे लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे. कोव्हॅॅक्सिन लशीच्या वापराचे प्रमाणदेखील सरासरीपेक्षा अधिक आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या क्रमवारीत लसमात्रेच्या वापरात पालघर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५.६४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी १८.७५ लाख नागरिकांची पहिली लसमात्रा तर ६.८९ लाख नागरिकांच्या दोन लसमात्रा पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या लसीकरणापैकी २४.१० लाख नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये १४.०७ पुरुष तर ११.५६ लाख महिलांचा समावेश आहे.

तरीही लशींचा काळाबाजार!

लसकुप्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या लसमात्रेचा पुरेपूर वापर करून अतिरिक्त राहणाऱ्या लशीच्या आधारे काही प्रतिष्ठित लोकांना तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये लसीकरण केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. राज्यात अव्वल राहिलेल्या जिल्ह्यातील अतिरिक्त लशीचा काळाबाजार होत असल्याचे आरोप होत असताना याच धर्तीवर राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त लशींचा गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.