पालघर : पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे राष्ट्रीय व खाजगी प्रकल्प येत असून हे प्रकल्प जिल्ह्याला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मुंबई लगतचे दुसरे विमानतळ पालघर मध्येच होणार याबाबत त्यांनी पुनरुच्चार केला.

केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी भाजपाचे लोकप्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात वाढवण व मुरबे बंदर, रिलायन्स इंडस्ट्रीजचा पीटी उद्योग, तसेच विमानतळ उभारण्यात येणार असल्याने या जिल्ह्यासाठी भविष्यकाळ उज्वल राहील असे त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात सागरी विमानतळ उभारण्यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विचारलेल्या एका प्रश्नात या विमानतळा संदर्भात कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती देण्यात आली होती. या अनुषंगाने पत्रकारांनी गणेश नाईक यांना छेडले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता निश्चितपणे होईल असे सांगत शासकीय व खाजगी जागेची उपलब्धता व पाहणी केली जात असल्याची माहिती दिली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूसंपादन करून प्रकल्पाचे ठिकाण व प्रकल्पाविषयीची घोषणा शासन करेल असा विश्वास व्यक्त केला.

विविध प्रकल्प उभारले जात असताना जिल्हा वासियांचा विकास व्हावा व त्यांचे राहणीमान साजेशे व्हावे यासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचावला जात आहे. समृद्धी मार्गाची जोडणी, मुंबई अहमदाबाद दरम्यान जोडण्यासाठी द्रुतगती मार्ग व बुलेट ट्रेन प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासन विविध योजना संदर्भात पैशाची उधळण करत असताना पालघर जिल्ह्यामधील जिल्हा सामान्य रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर व इतर आरोग्य संस्थांकरिता निधी उपलब्ध करून देत नाही या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य विषयी प्रकल्पांचा आढावा घेऊन निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. शिवाय जिल्ह्यातील नागरिकांची कोणत्याही दृष्टीने परवड होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल असे ते म्हणाले.

अत्याधुनिक पद्धतीच्या मासेमारीसाठी केंद्र सरकारने विविध योजना आणल्या संदर्भात माहिती दिली असताना पारंपारिक मच्छिमारांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचीही विचारणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी पारंपारिक मच्छीमारांचे हीत जपले जाईल तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना उद्योग धंदे व नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी आश्वासित केले.

टॅक्स मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळण्यासाठी करणार प्रयत्न

तारापूर अणुऊर्जा केंद्राची उभारणी करताना भूसंपादन झालेल्या तसेच पुनर्वसित झालेल्या कुटुंबातील किमान एक सदस्याला कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यापैकी अनेक कर्मचारी वयोमानानुसार निवृत्त झाले असून त्यांच्या जागी परप्रांतीय कंत्राटी कामगारांना भरले जात असल्याचे लोकप्रतिनिधींनी आपल्या निदर्शनास आणून दिले होते. पुनर्वसन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वेदना व भावना समजून घेणे आवश्यक असून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तारापूर अणुऊर्जा केंद्रात कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गणेश नाईक यांनी पत्रकारांपुढे बाजू मांडतांना यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. या अणुऊर्जा प्रकल्पात स्थानिक मंडळींना पात्रतेनुसार नोकरी मिळावी याकरिता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पाठपुरावा करण्याच्या त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सूचना दिल्याचे पत्रकारांना सांगितले.