बोईसर : ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
पालघर येथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व शिवसेना उद्धव (ठाकरे) पक्षाचे उपनेते उदय बंधू पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत , खासदार डॉक्टर हेमंत सावरा, माजी मंत्री मनीषा निमकर, विश्वनाथ पाटील, ज्योती ठाकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेले काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रचारादरम्यान दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक वेळा शाब्दिक चकमकी बघायला मिळाल्या. निवडणुका संपल्यानंतर देखील शिंदे आणि नाईक यांच्यामधील वाद अजूनही सुरूच आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उदय बंधू पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सफाळे येथे सर्वपक्षीय जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरून बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता शाब्दिक टोले लगावले.
व्यासपीठावरून बोलताना ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा जो इतिहास सध्या सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असे गणेश नाईक म्हणाले. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हाप्रमुख मो.दा.जोशी, सतीश प्रधान, साबीर शेख त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर आनंद दिघे होते. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेली तरुण पिढी त्यावेळच्या सत्ताधीशांसोबत संघर्ष करत होती, मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. मरणाची भीती वाटत नाही, ज्या लोकांना मरणाची भीती वाटत असते त्यांच्या जीवनात काही अर्थ नसतो असे म्हणत शिवसेनेच्या जुन्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
