scorecardresearch

वाडा कोलमला भौगोलिक मानांकन

दीडशे वर्षांपासून चव आणि विविध गुणांमुळे मागणी असलेल्या या वाणाला दर्जा मिळाल्याने येथील शेतकरी आनंदला आहे.

वाडा कोलमला भौगोलिक मानांकन

|| रमेश पाटील
अखेर तत्त्वत: मान्यता; वाण टिकविण्यास उपयुक्त
वाडा : भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या आणि वाडा तालुक्यात पिकविल्या जाणाऱ्या ‘वाडा कोलम’ला अखेर न्याय मिळाला. कित्येक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या वाणाला भौगोलिक मानांकन (‘जीआय’) प्राप्त झाला आहे. दीडशे वर्षांपासून चव आणि विविध गुणांमुळे मागणी असलेल्या या वाणाला दर्जा मिळाल्याने येथील शेतकरी आनंदला आहे.

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शेतकरी हे भात शेतीवर अवलंबून आहेत. येथील वाडा कोलमला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे यासाठी येथील वाडा कोलम उत्पादक शेतकरी संस्था गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत होती. अखेर बुधवारी भौगोलिक मानांकन (‘जीआय’) देण्याबाबत केंद्राकडून तत्त्वत: मौखिक स्वीकृती देण्यात आली आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर व अधिक उत्पन्न देणाऱ्या हायब्रीड, संकरित वाणांमुळे व वाडा कोलमच्या नावाने अन्य राज्यांतील तांदूळ विकला जात असल्याने त्याचा परिणाम मूळ वाडा कोलम तांदळावर झाल्याने गेले काही वर्षे वाडा तालुक्यात वाडा कोलमचे उत्पन्न कमी झाले होते.

वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने ‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’च्या माध्यमातून प्रा. गणेश हिंगमिरे यांनी चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी केंद्राकडे वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल केला होता. बुधवारी मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात जीआय मिळण्याच्या दृष्टीने पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

महत्त्व काय?

वाडा येथील प्रसिद्ध झिणी कोलमच्या नावाखाली त्यासारख्याच दिसणाऱ्या अन्य तांदळाच्या विक्रीतून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसेच वाडा कोलम उत्पादन करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. त्यासाठी भौगोलिक मानांकन गरजेचे होते.

स्वतंत्र ओळख…

 या मानांकनामुळे ‘वाडा कोलम’ या वाणाचे अस्तित्व कायम राहू शकेल. हा तांदूळ पिकविण्यासाठी आणखी शेतकरी पुढे येतील.

‘वाडा कोलम’ ला भौगोलिक मानांकनसाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. अद्याप विद्यापीठ आणि संबंधित संस्थांच्या काही बाबींची पूर्तता होणे शिल्लक आहे.       – के.बी.तरकसे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Geographical designation of wada kolam akp

ताज्या बातम्या