घोडबंदर पूल डिसेंबपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न; मुंबई-अहमदाबाद मार्गावर तीन नवीन पुलांना मंजुरी

घोडबंदर खाडीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या चौपदरी पुलाचे बांधकाम सुरू असले

घोडबंदर पूल डिसेंबपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न; मुंबई-अहमदाबाद मार्गावर तीन नवीन पुलांना मंजुरी

पालघर : मुंबई – अहमदाबाद मार्गावर घोडबंदर (वर्सोवा) येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नव्याने पूल बांधण्याचे काम सुरू असून हे काम डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याखेरीज महामार्गावर तीन अपघात प्रवण क्षेत्रामध्ये उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

रस्ता सुरक्षा समितीची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सूरज सिंह, खासदार राजेंद्र गावीत तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वर्सोवा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत विचारणा केली असता ठाण्याकडे जाण्याचा मार्ग खुला होईपर्यंत कोंडीची परिस्थिती कायम राहील असे सांगण्यात आले. संपूर्ण घोडबंदर पूल कार्यरत करण्यासाठी वर्षअखेर उजाडण्याची शक्यता आहे. तरीदेखील हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहील, असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

घोडबंदर खाडीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या चौपदरी पुलाचे बांधकाम सुरू असले तरी सध्या अस्तित्वात असणाऱ्या दोन दुपदरी पुलांची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. या महामार्गावर भरूच येथे उद्भवलेल्या पुलाची समस्या टाळायची असल्यास आतापासून लोकप्रतिनिधींनी नव्या चौपदरी पुलाची मागणी रेटून धरावी असे प्राधिकरणातर्फे सुचविण्यात आले.

सध्या आंबोली व चारोटीजवळील एशियन पंप व अल्फा हॉटेल येथे असणाऱ्या अधिकृत रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झाल्याने त्याबाबत पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. मालजीपाडा व घोडबंदर पुलाजवळील भागामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग निर्माण करणे तसेच त्या पट्टय़ातील रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्यात येईल असे या बैठकीत महामार्ग प्राधिकरणतर्फे सांगण्यात आले.

डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपूल तसेच पालघर तालुक्यातील मेंढवन या ठिकाणी पुलावर वळणदार रस्ता असल्याने अनेक अपघात होत असल्याने या पुलांवरील वळणदार रस्ता सरळ करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावीत यांनी केली. हे बदल करणे लागलीच शक्य नसल्याने तोवर वाहनचालकांच्या निदर्शनास यावे म्हणून विशेष प्रकाश योजना या पदांवर करण्यात येईल असे सूरज सिंह यांनी सांगितले.

पुलाची उंची वाढवण्याची मागणी
पालघर तालुक्यातील दुर्वेस येथे उभारण्यात आलेल्या पुलाची उंची कमी असल्याने त्यामधून लक्झरी बस ट्रक व इतर अवजड वाहन जाऊ शकत नाहीत. या वाहनांना पडणारा मोठा वळसा टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवण्याची मागणी समितीच्या सदस्य व प्रतिनिधी यांनी केली.

मंजूर पूल
पालघर तालुक्यात महामार्गावरील मनोरजवळील विक्रमगड फाटा येथे तसेच नांदगाव अशा दोन पुलांना मंजुरी मिळाली आहे. तसेच तलासरी तालुक्यातील आच्छाड येथे असणाऱ्या रस्ता क्रॉसिंग (कट) ऐवजी उड्डाणपूल बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ghodbunder bridge efforts of national highways authority till dec amy

Next Story
उपनगरीय क्षेत्र असूनही रेल्वे गाडय़ा मात्र मर्यादित ; नऊ वर्षांपासून डहाणू- वैतरणा भागांतील महिला प्रवाशांचे हाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी