पावसामुळे झालेल्या पीक हानीमुळे शेतकरी हवालदिल

वाडा :  मागील आठवडय़ात कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिके, किलगड, फुलशेती, भाजीपाला शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान केलेले असताना गेल्या पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासनामधील एकही अधिकारी, कर्मचारी फिरकला नसल्याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

बुधवारी वाडा तालुक्यात ठिकठिकाणी सरासरी  ९० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने येथील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे, किलगड, फुलशेती, विविध प्रकारच्या भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान केले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी, कृषी सहायक, तहसीलदार, तलाठी, गटविकास अधिकारी येतील व नुकसानीचे पंचनामे करतील अशी भाबडी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र अवकाळी पावसाने नुकसान होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी एकही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी या नुकसानीकडे ढुंकूनही बघितले नसल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे.

काही शेतकऱ्यांनी कृषि अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता मिटींगमध्ये असल्याचे सांगून नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणे टाळले.  वाडा तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार असतानाही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलायला तयार नाहीत, येथील विरोधी पक्षाचे पदाधिकारीही याबाबत आवाज उठवित नसल्याने शेतकऱ्यांना कुणीच वाली नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

विमा कंपन्यांचे कानावर हात

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा कंपन्यांकडे विमा काढलेला आहे. या विमा कंपन्यांकडे पिकांचे नुकसान झालेले छायाचित्रे पाठविले असता, सक्षम अधिका-यांचे नुकसानीचे पंचनामे असल्याशिवाय विम्याची रक्कम देता येणार नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले गेले. सक्षम अधिकारी पंचनामे करण्यास तयार नाहीत, विमा कंपन्या भरपाईबाबत बोलण्यास तयार नाहीत, शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची या दुहेरी संकटात येथील शेतकरी अडकला आहे.

अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीबाबत वारंवार संपर्क करूनही महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी दाद घ्यायला तयार नाहीत.

कुमार पष्टे, हरभरा उत्पादक शेतकरी, गातेस, ता. वाडा

वरिष्ठांचे आदेश नसल्याने पंचनामे करता येत नाहीत, तरीसुद्धा नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

 – एस. पी. इंगळे , तालुका कृषी अधिकारी, वाडा.