scorecardresearch

केळवा किनारा असुरक्षित

केळवे ग्रामपंचायतीकडून समुद्रकिनारी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून पाच रुपये शुल्क आकारणी करण्यात येते.

सुरक्षा, स्वच्छता करापोटी वर्षांला दहा लाखांचे उत्पन्न तरी ग्रामपंचायतीकडून उपायांकडे दुर्लक्ष

पालघर: केळवा समुद्रात चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. पर्यटकांकडून सुरक्षा व स्वच्छता कर तसेच पार्किंगपोटी पर्यटकांकडून वर्षांला सुमारे १० ते ११ लाख उत्पन्न मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीकडून येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था ठेवली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एकंदरीत हा किनारा पर्यटकांसाठी आता धोकादायक ठरू लागला आहे.

केळवे ग्रामपंचायतीकडून समुद्रकिनारी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून पाच रुपये शुल्क आकारणी करण्यात येते. त्यामध्ये स्वच्छता (३  रुपये ) व सुरक्षा कराचा (२ रुपये) यांचा समावेश आहे. त्याचबरोबरीने केळवे गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांकडून शुल्क आकारणी करण्यात येते. समुद्रकिनारी प्रवेश घेणे तसेच शौचालय व चेंजिंग रूमची देखभाल करण्यासाठी पूर्वी सुमारे वार्षिक नऊ लाख रुपये किमतीचा ठेका दिला जात होता. परंतु करोनाकाळात साडेसात लाख रुपयांच्या किमतीत देण्यात आला आहे. याखेरीज पार्किंगचा ठेका पावणेतीन लाख रुपयाला देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीला पर्यटकांवर लादलेल्या शुल्कामधून सर्वसाधारणपणे प्रति महिना ८० ते ९०  हजार रुपये उपलब्ध होत आहेत. ३ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळी पूर्वी जीवरक्षक म्हणून काम केलेले गृहस्थ स्वत:च्या स्वतंत्र व्यवसायानिमित्त समुद्रकिनाऱ्यावर होते. त्यांनी व सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली असता पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने बचावासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे जाणवले. त्यानंतर एका सहकाऱ्याला सुमारे २०० मीटर लांबीवर असणाऱ्या शौचालयाजवळ ठेवलेल्या लाइफ जॅकेट, रिंग बोया व दोर मागविल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून समजते.  केळवा समुद्रकिनारी  हजारे पर्यटक येत असतात प्रत्येक १०० ते १२५ मीटर लांबीच्या किनाऱ्यावर एक जीवरक्षक नेमणे आवश्यक असताना ग्रामपंचायतींनी पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले आहे. केळवा दुर्घटनेत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारीधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात  ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडावे यांच्याशी संपर्क साधला असता किनारी असणाऱ्या एकमेव जीवरक्षकाचा राजीनामा ग्रामपंचायतीने स्वीकारला नसल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र गेल्या पाच महिन्यांत त्याला कोणतेही मानधन दिले  नसल्याचे या निदर्शनास आणून दिल्यानंतर याविषयी  वक्तव्य  टाळले.

जीवरक्षकच नाही

सन २०१७ मध्ये पर्यटकांकडून शुल्क आकारणीची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १४३ अंतर्गत अधिकार प्राप्त झाल्यानंतर सुमारे ७०० ते ८०० मीटर समुद्रकिनारा लाभलेल्या केळवे ग्रामपंचायतीने दोन टेहळणी मनोरे उभारले व तीन जीवरक्षक यांची नेमणूक केली होती. या जीवरक्षकांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांचे मानधन परवडत नसल्याने त्यापैकी दोघांनी नोकरी सोडली होती. अशा परिस्थितीत उर्वरित एका जीवरक्षकाला दरमहा नऊ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. मात्र करोनाकाळात कामाची व्याप्ती व ग्रामपंचायतीमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पाच महिन्यांपासून या जीवरक्षकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वार्षिक उत्पन्न

(करोना निर्बंध शिथिलतेत)

२०२०-२१

पार्किंग शुल्क ६४,००० (४ महिने)

प्रवेश शुल्क ८,५०,०००

२०२१-२२

पार्किंग शुल्क ३,०७०००

प्रवेश शुल्क ८,२५,०००

बचावकार्यासाठी मोठी दुर्बीण, चार्जिग टॉर्च मोठी, दोरखंड, टय़ूब, लाइफ जॅकेट, शिट्टी व सायरन असे साहित्य आवश्यक असताना यापैकी अधिकतर सामग्री केळवे येथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gram panchayat ignoring measures for unsafe kelva beach zws

ताज्या बातम्या