वाडा: लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतरही महिला सरपंचावर प्रशासनाकडून पदमुक्त किंवा अपात्रतेची कारवाई झाली नसल्याने सरपंच पदावर आजही विराजमान राहिलेल्या महिला सरपंच शोभा गवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी “ग्रामसभा” अखेर कोरम अभावी “तहकूब” झाली आहे. त्यामुळे या महिला सरपंचाच्या विरोधात ग्रामस्थांची मोठी नाराजी व अविश्वास असल्याचे दिसून आले आहे.
वाडा तालुक्यातील “सापरोंडे – मांगाठणे” ग्रामपंचायतीमध्ये सन २०२५ -२६ या आर्थिक वर्षातील पहिली “ग्रामसभा” नियमानुसार घेणे आवश्यक असल्याने वादग्रस्त सरपंच शोभा गवारी यांच्या अध्यक्षेतखाली (२३ मे) आयोजित करण्यात आली होती. याबाबत तसे “ग्रामसभा अजेंडाचे पत्र” काढले होते, त्यावर सरपंच शोभा गवारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे सही व शिक्का होते.
दरम्यान, शुक्रवार २३ मे रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या ग्रामसभेला कोरम पूर्ण करण्यासाठी १०० ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र मोठी प्रतिक्षा करूनही १५०० लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या गावातील यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मिळून केवळ २५ जणांचीच उपस्थिती राहिल्याने कोरम अभावी ग्रामसभा तहकूब झाली आहे. अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी किरण हरड यांनी दिली. या ग्रामपंचायतीच्या लाचखोर सरपंचाबद्दल ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी व अविश्वास असल्याने ग्रामसभेवर बहिष्कार घातला असल्याचे सांगितले जात आहे.
“सापरोंडे – मांगाठणे” ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील महिन्यात १९ हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी २५ एप्रिल रोजी अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंचा विरोधात कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र सक्षम अधिकाऱ्यांकडून सरपंच शोभा गवारी यांना पदमुक्त, अपात्र किंवा निलंबित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यातच शासनाच्या निर्णयाचा पळवाटांचा आधार घेत सरपंचाचे पद कायम राहिले आहे.
याच प्रशासकीय प्रक्रियेच्या दिरंगाईचा आधार घेत ग्रामसभा बोलावण्याचा प्रताप लाचखोर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी केला होता. याबाबत वास्तवता दर्शविणारे वृत्त “लोकसत्ता” मध्ये “लाचखोर महिला सरपंचाकडून २३ “मे”ला ग्रामसभा बोलावण्याचा प्रताप” हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची ग्रामस्थांनी व प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
त्यामुळे सापरोंडे – मांगाठणे ग्रामस्थांनी “लोकसत्ताचे वृत्त” गांभीर्याने घेत सरपंचाच्या कार्यपद्धतीबाबत मोठी नाराजी व्यक्त करत सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिक्रया
लाचखोर सरपंचाच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. तेथुन प्रस्ताव आमच्याकडे आल्यास जलद गतीने प्रक्रिया करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. – मीनल कुटे, उपायुक्त (ग्रामपंचायत), कोंकण विभागीय आयुक्त कार्यालय.