पालघर: पालघर जिल्हाधिकारी संकुलाच्या आवारामध्ये येत्या काही दिवसात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या संकुलात सिडकोने वृक्ष लागवडीकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नसल्याने वृक्ष लागवडीची जबाबदारी एका सेवाभावी संस्थेवर येऊन ठेपली आहे.

सुमारे १०३ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या जिल्हा मुख्यालय संकुलात वृक्ष दिसून येत नाहीत. त्यामुळे दिवसभरात या संकुलात उभे राहण्यासाठी सावलीचे ठिकाण उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यातर्फे पाच हजार झाडांचे रोपण येत्या काही दिवसात हाती घेण्यात येणार आहे. किमान पाच फूट उंची पेक्षा अधिक  तसेच देशी-प्रजातींच्या झाडांचा यात समावेश करण्यात आला आहे. झाडांची पुढील तीन वर्ष देखभाल ही सेवाभावी संस्था करणार आहे.

जिल्हा मुख्यालय संकुलाच्या आवारामध्ये तसेच आवाराच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी ३० जुलैपर्यंत वृक्षारोपण केले जाणार असून लागवड केलेल्या वृक्षांच्या संरक्षणासाठी सुविधा करण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांची वाढ जलदगतीने व्हावी यासाठी कमी अंतरावर वृक्षलागवड करण्यात येईल असेही सांगण्यात आले. सोबत त्यांना पाणी देण्याची व्यवस्था देखील उभारण्यात येणार असून अवाढव्य असणारे जिल्हा मुख्यालय परिसर हिरवे गार होण्यासाठी प्रकल्प येत्या काही दिवसात हाती घेण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात तसेच मोर्चा मैदानावर देखील वृक्ष लागवड होणार आहे.

सिडको कडून नियोजनाचा अभाव

सिडको तर्फे उभारण्यात आलेल्या अवाढव्य जिल्हा मुख्यालयात ज्याप्रमाणे या वास्तूची देखभाल— दुरुस्तीचा विचार योग्य पद्धतीने करण्यात आला नाही. त्याच धर्तीवर वृक्ष लागवडीसाठी देखील सिडकोने विशेष प्रयोजन केल्याचे दिसून आले नाही. जिल्हा मुख्यालयाचे बांधकाम तीन वर्षांपेक्षा अधिक  काळ सुरू राहिल्याने या कालावधीत सिडकोने वृक्षलागवड केली असती तर मोठय़ा प्रमाणात हिरवळ व सावली उपलब्ध झाली असती.

वृक्ष प्रजाती

नीम, करंज, गुलमोहर, काशीद, खया, तादंबा, ताम्हण, शिवान, खैर, तिकोमा, पिंपळ, वड, बांबू, आवळा, चिंच, हिरडा, बेहरा, रिठा, बदाम आणि घाईपथ