पालकमंत्र्यांना पालघर विश्रामगृह नापसंत?

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मुख्यालय ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये मोठे फेरबदल करून विश्रामगृह अद्ययावत व विस्तारीकरण करण्यात आले.

पक्षीय कार्यकर्त्यांपासून अलिप्त राहण्याचा खटाटोप असल्याबाबत शंका

पालघर : पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मुख्यालय ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये मोठे फेरबदल करून विश्रामगृह अद्ययावत व विस्तारीकरण करण्यात आले. तरीही पालकमंत्री दादा भुसे हे या ठिकाणी वास्तव्य करण्याचे टाळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालघरचे विश्रामगृह पालकमंत्र्यांना धार्जिणे नाही का?  की पक्षीय कार्यकर्त्यांपासून अलिप्त राहण्यासाठी हा खटाटोप आहे? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहामध्ये मोठे फेरबदल करून बांधकाम व अंतर्गत सजावट- फर्निचरवर प्रत्येकी सुमारे पाच कोटी रुपये व विद्युतीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये असा सुमारे अकरा कोटी रुपयांचा खर्च करून आलिशान विश्रामगृह तयार करण्यात आले. यामध्ये अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींसाठी एक कक्ष, महत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींसाठी चार विशेष कक्ष उभारण्यात आले असून इतर १६ कक्षदेखील एखाद्या तारांकित हॉटेलच्या बरोबरीचे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये साजेशी अंतर्गत सजावट व फर्निचर आहे. शासकीय विश्रामगृहाचा अनेक मंत्र्यांनी वापर केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये हे नवीन शासकीय विश्रामगृह कार्यरत झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी फक्त एक वेळा वास्तव्य केले होते. त्यानंतर किमान पाच-सहा वेळा त्यांनी पालघरमध्ये वास्तव्य करताना तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या विश्रामगृहामध्ये विसावा घेतला आहे. पालकमंत्री जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणासाठी येतानादेखील बोईसर येथून प्रवास करतात. त्यामुळे मुख्यालय ठिकाणी निवास करण्याचे ते टाळत असल्याचे दिसून आले आहे.

पालघर शासकीय निवासस्थानी पहिल्या वेळी निवास करताना पालकमंत्री यांना कटू अनुभव आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून बोलले जात आहे. तरीसुद्धा नव्याने उभारण्यात आलेल्या विश्रामगृहात मुबलक पाणी, खेळती हवा व स्वच्छता राखण्यात येत असून त्या ठिकाणी डास-ढेकूण नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर पालघरचे विश्रामगृह पालकमंत्री यांना पसंत नाही का? किंवा पक्षीय कार्यकर्त्यांपासून अलिप्त राहण्यासाठी त्यांना बोईसर येथे राहणे सोईस्कर वाटते का? असा सवाल शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकंदर पालकमंत्री यांचे पालघर येथील वास्तव्य न करण्याचे कारण गेल्या दोन वर्षांपासून गुलदस्त्यात राहिले आहे. त्याविषयी अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

दातिवरे येथे वास्तव्य

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री दोन दिवसांच्या पालघर दौऱ्यावर असून २४ जानेवारी रोजी शासकीय व्यवस्थेला अधिकृत माहिती न देता पालकमंत्री यांनी दातिवरे येथे निवास केल्याचे सांगण्यात येते. पर्यटन विकासासाठी डोंगराळ भागात अधिक निधी खर्च केला जात असताना किनारपट्टीच्या सौंदर्याचा पालकमंत्री यांनी आनंद घेतल्याबद्दल पर्यटन व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guardian minister dislikes rest house ysh

Next Story
सभेत विकासात्मक चर्चेकडे दुर्लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी